कोरोना लस विदर्भात दाखल 

१६ जानेवारी २0२१ पासून संपूर्ण देशात करोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.   परंतु लस कधी येणार? याचीच सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली असून, बुधवारी  रात्री उशीरा नागपूर  जिल्ह्याला मंजूर असलेल्या ४२ हजार लसीची पहिली खेप रेफ्रिजरेटर कंटेनरमधून विदर्भात दाखल झाली. लसींचे कंटेनर अकोला येथून नागपुरात पोहोचले. 
पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना हे लसीकरण होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील लस ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली ‘कोविशिल्ड’ लस आहे. ही  लस  २ ते ८ अंश सेल्सियस इतक्या तापमानामध्ये सहज ठेवल्या जाऊ शकते.
शनिवारपासून सुरू होणार्‍या या लसीकरणामध्ये प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १00 आरोग्य कर्मचार्‍यांना एका दिवशी लस टोचण्यात येणार आहे. जिल्ह्यात आजवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जवळपास २४ हजार तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ११ हजार ९२२ शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्‍यांची कोविड अँपवर लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे.
यापैकी बहुतांश कर्मचार्‍यांची कोविड पोर्टलवर नोंदही झाली आहे. शहरी भागात लसीच्या साठवणुकीसाठी  ४८ तर ग्रामीण भागामध्ये ६८ कोल्ड चेन पॉईन्ट्सची व्यवस्था आहे. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर आरोग्य कर्मचार्‍यांना २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. लस नागपुरात दाखल झाल्यानंतर ती सर्वप्रथम आरोग्य उपसंचालक कार्यालय येथे पोहचली  आहे. यानंतर येथून ती लस नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात येणार आहे. संपूर्ण विभागात ४४ केंद्रावर लसीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.