४० दिवसांनी बाधितांची संख्या पुन्हा पाचशे पार

२४ तासांत ९ मृत्यू; ५१५ नवीन रुग्ण

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून (२९ आणि ३० नोव्हेंबर) नागपूर जिल्ह्यातील नवीन बाधितांची संख्या कमी असल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला होता. परंतु आज मंगळवारी ४० दिवसांनी जिल्ह्यातील नवीन बाधितांची  पाचशेहून अधिक संख्या नोंदवल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. याशिवाय २४ तासांत ९ मृत्यू नोंदवले गेले.

नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२० रोजी दिवसभरात ६०२ करोना बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर रोजची रुग्णसंख्या पाचशेहून खाली म्हणजे २५० ते ४०० दरम्यान होती. मध्यंतरी तीनशेहून कमी रुग्ण आढळत होते. दिवाळीनंतर २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान  सलग चारशेहून अधिक रुग्ण आढळले. परंतु दोन दिवस तीनशेहून कमी बाधित आढळले. मंगळवारी अचानक जिल्ह्यात ५१५ बाधित आढळले. त्यात शहरातील ४१७, ग्रामीणचे ९४ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समवेश होता. त्यामुळे आजपर्यंत शहरातील बाधितांची संख्या ८८ हजार ७४६, ग्रामीण २२ हजार ८४०, जिल्ह्याबाहेरील ६९४ अशी एकूण १ लाख १२ हजार २८० वर पोहचली आहे. तर २४ तासांत शहरात ३, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण ९ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ५३७, ग्रामीण ६३२, जिल्ह्याबाहेरील ५१२ अशी एकूण ३ हजार ६८१ वर पोहचली आहे.

१०.३५ टक्के अहवाल सकारात्मक

शहरात  दिवसभरात ४ हजार ४७१, ग्रामीणला ५०१ अशा एकूण ४ हजार ९७२ चाचण्या झाल्या. त्यातील १०.३५ टक्के अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले.  मंगळवारी शहरातील  उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ हजार ३२१, ग्रामीण ७१२ अशी एकूण ५ हजार ३३ होती. त्यातील १ हजार ३२ रुग्ण विविध रुग्णालयांत तर ३ हजार ४८६ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

पुन्हा करोनामुक्तांहून बाधित अधिक

जिल्ह्यात २८ नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत सलग दोन दिवस नवीन करोनाबाधितांहून करोनामुक्त अधिक आढळत होते. मंगळवारी पुन्हा स्थिती उलट झाली. मंगळवारी शहरात ३७०, ग्रामीणला २९ असे एकूण ३९९ व्यक्ती करोनामुक्त झाले तर दिवसभरात ५१५ बाधित आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.