नगरसेवक बंटी शेळके यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, दुसऱ्याच दिवशी अटक

नागपूर: कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान यानंतर बंटी शेळके यांना एका खासगी रुग्णालयात गोंधळ घातल्याप्रकरणी दुसऱ्याच दिवशी लकडगंज पोलिसांनी अटक केली.
बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त घातलेल्या या गोंधळाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत ‘यांना जाळून टाकू’, अशी धमकीही दिली. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते. या सगळ्यांदेखत बंटी शेळके यांनी नाशिकमधील सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती.
भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी ‘सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा’ असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.

पोलिसांची कारवाई
शेळके यांनी गोंधळ घातला तेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे उपस्थित होते. यानंतर दुसऱ्या दिवशी आज, २८ एप्रिल रोजी शेळके एका खासगी रुग्णालयात गेले. कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पोलिस उपायुक्त मतानी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी शेळके यांना ताब्यात घेतले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.