बलात्कार पिडीतेचे नाव उघड केल्याने अक्षय, सलमानसह ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा!

नवी दिल्ली : देशाला सुन्न करणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार घटनेनंतर सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली होती. २०१९ मध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत न्यायाची मागणी केली होती. यामध्ये अनेक नामांकित बॉलिवूड आणि टॉलिवूड कलाकारांचा समावेश होता. मात्र, घटनेबद्दल खेद व्यक्त होताना पीडितेचे खरे नाव उघड केल्याने तब्बल ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, रकुलप्रीत सिंग यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचे नाव, फोटो किंवा खरी ओळख उघड करणे हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी पीडितेचे नाव उघड करणाऱ्या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २२८ अ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल केलेल्या या ३८ सेलिब्रिटींवर काय कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. ‘सर्वसामान्यांसमोर आदर्श उदाहरण सादर करण्याऐवजी हे सेलिब्रिटी उलट नियम मोडत आहेत. संबंधित सेलिब्रिटींना अटक करण्यात यावी’, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.