सौर ऊर्जा कंपनीचे लोकार्पण, महिलांद्वारा निर्मित आणि संचलित

राज्यातील पहिलाच उपक्रम

सोलर पॅनल निर्मीतीचे काम देशात साधारणत: मोठया कंपन्यांमार्फत केले जाते. मात्र वर्धा जिल्हयातील फारसे शिक्षण न झालेल्या  बचत गटाच्या महिलांनी  सोलर पॅनल निर्मितीसारख्या  तांत्रिक  कामामध्ये  प्राविण्य मिळवून उद्योगात भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत  गटामार्फत सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि देशातील दुसरे उदाहरण आहे. महिलांद्वारे संचालित या कंपनीचा प्रारंभ पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचे हस्ते 26 जानेवारीला होत आहे.  

महिला बचत गटांच्या विविध  नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी  वर्धा जिल्हा अग्रेसर राहिला आहे.  देवळी तालुक्यातील कवठा झोपडी गावात उमेद अभियानांतर्गत  बचत गट व ग्रामसंघ तयार करण्यात आले. महिलांच्या एकत्रीकरणातूनच उद्योगाची संकल्पना पुढे आली. या गावातील तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वतः महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली एक महिला औद्योगिक को-ऑपरेटिव्ह संस्था आहे. तेजस्वी सोलर एनर्जीची सुरुवात मार्च 2018 मध्ये झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभागमार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामसंघासाठी 2 कोटी 62 लक्ष कोटीचे भागभांडवल तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्थेला मंजूर करून त्यापैकी 1 कोटी 83 लक्ष रूपये उपलब्ध करून दिले आहे

तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची नोंदणी को-आपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत करण्यात आली असून त्यामध्ये 214 महिला समभागधारक आहेत. त्यापैकी 200 महिला ह्या मागासवर्गीय आहेत. यातील महिलांना या प्रकल्पासाठी वर्धा उमेद अभियानयामार्फत प्रकल्प अहवाल तयार करून त्याला जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे, फॅक्टरी शेड बांधकामासाठी, शेड उभारण्यासाठी ई- निविदा प्रकिया राबविणे, मशिन खरेदी, उभारणी, को-ऑपरेटिव्ह संस्था म्हणून नोंदणी तसेच वस्तू व सेवा कर नोंदणी इत्यादी कामे करण्यासाठी सहकार्य करण्यात आले. तसेच प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन आय. आय. टी. मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख यांनी केले आहे. या प्रकल्पातील 12 महिलांना दुर्गा सोलर एनर्जी (डुंगरपुर राजस्थान) येथे सोलर पॅनल निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच वर्षभर श्री देशमुख यांनी गावात राहून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. यात कंपनी चालविण्यासाठी लागणारे कौशल्य, माहिती तंत्रज्ञान,आर्थिक व्यवस्थापन, अकाऊंट, टॅली, कच्चा माल ऑनलाईन मागविणे, मार्केटिंग इत्यादी संपूर्ण प्रशिक्षण आय. आय. टी. मुंबई यांनी दिले.  

“वर्धा जिल्हा हा नेहमीच बचतगटांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी अग्रेसर राहिलेला आहे. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी, येथील तेजस्वी सोलर एनर्जी प्रकल्पामार्फत सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर होम लाईट बनविण्यात येत आहेत. महिलांना शाश्वत रोजगार मिळून देणे हा या प्रकल्पाचा उदेश आहे यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.”-डॉ. सचिन ओंबासे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.वर्धा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.