बेळगावात मराठी माणसांचा नाही तर राऊतांच्या अहंकाराचा पराभव’


देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. दुसरीकडे भाजपाला यश मिळाल्याने महाराष्ट्रात विजयाचा आनंद व्यक्त केला जात असताना शिवसेनेकडून मात्र टीका करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना टीका केली होती. ‘बेळगावमध्ये मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटताय, लाज नाही वाटत तुम्हाला?’ असा सवालच राऊत यांनी भाजपाला केला होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
‘बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही. बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा आणि एखाद्या पक्षाचा पराभव यामध्ये फरक आहे. कारण मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही,’ असे सांगत फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांची गोवा राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आले. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गोव्यात जे काही काम केले आहे त्याच्या आधारे जनता पुन्हा एकदा आम्हाला निवडून देईल हा विश्वास आहे. गोव्यात गेल्या चार निवडणुका मी सातत्याने जात असून गोव्याचा परिचय आहे. यावेळच्या निवडणुकीत मनोहर पर्रीकर आमच्यासोबत नसणार आहेत. मात्र, त्यांनी पक्षाला दिशा आणि विस्तार दिला आहे त्याच्या आधारे निवडून जाईल,’ असे फडणवीसांनी यावेळी सांगितले. तसेच ‘अमित शाह, राजनाथ सिंग व नितीन गडकरी या सर्वांची मदत आम्हाला मिळणार आहे. दोन राज्यमंत्रीदेखील सोबत असणार आहेत. त्यामुळे आमच्या परीने पूर्ण मेहनतीने गोव्यात पुन्हा भाजपाचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करु’. सचिन वाझे प्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीट प्रकरणी बोलताना ते म्हणाले, ‘घटनाक्रम सरकारला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात पोलीसमधील लोक अशा प्रकारची घटना करु शकतात यापेक्षा धक्कादायक काय असू शकते?’
यावेळी चिपी विमानतळाच्या उद्धाटनावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की, ‘सर्व गोष्टी समनव्यानेच झाल्या पाहिजेत. पण चिपी विमानतळ तयार करण्यात राणेंचा सहभाग कोणी नाकारु शकत नाही. त्यांच्या पुढाकारानेच काम सुरु झालं आणि मी मुख्यमंत्री असताना काम पूर्ण झाले. आता विमानतळ सुरु होत असताना वाद निर्माण न करता कोककणासाठी आणि पर्यटनासाठी चालना देणारे विमानतळ सुरू होणे महत्वाचे आहे. राणेंचे आणि केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांचे अभिनंदन करतो. राज्य आणि केंद्राने समन्वयानेच काम करायचं असतं. त्यामुळे श्रेयवादाची लढाई नाही. राणेंचं योगदान कोणी नाकारु शकत नाही’.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.