बिनविरोध निवडणूक घेणार्‍या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा विकासनिधी

उमरेड

आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना
गाव करी ते राव न करी, अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. मात्र, ग्रामपंचायतची निवडणूक आली न आली तर गावातील एकोप्याला बर्‍याचवेळा तडा जाताना आपण अनुभवतो. गावचा विकास म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विकास, असे समजून गावात वादविवाद वाढू द्यायचे नसेलतर ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध व्हायला हवे. विधानसभा मतदारसंघात असलेले सामाजिक व राजकीय सौदार्हाचे वातावरण अधिकच घट्ट करण्यासाठी निवडणुका बिनविरोध घ्या, अशा आवाहनासह बिनविरोध निवडणूक घेणार्‍या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून २५ लाखांचा विकासनिधी देण्यात येणार असल्याची घोषणा उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी केली आहे.
उमरेड येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात विधानसभा क्षेत्रातील उमरेड, कुही व भिवापूर तिन्ही तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध आणण्याकरिता रविवारी आढावा बैठक बोलावून चर्चा करण्यात आली, याप्रसंगी बोलताना घोषणा केली. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये उमरेड तालुक्यात १४, कुही २५ व भिवापूर ३ अशा एकूण ४२ ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे भावाभावकीत तेढ निर्माण करणारी एक राजकीय व सामाजिक निवडणूक असून, गावातील आपसातील वातावरण ढवळून काढणारी लढाईच व निवडणुकामध्ये राजकीय वैमनस्य जोपासण्याचे काम मोठय़ाप्रमाणावर केल्या जाते. धुर्‍याच्या भांडणाचाही वाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समोर काढून चांगले संबंध बिघडतात. बर्‍याचप्रसंगी मारामारीपर्यंत वाद विकोपाला जात असतो. पुढे यातून पोलिस ठाणे तसेच न्यायालयाच्या चकरा मारता मारता पायाच्या चप्पली झिंजून जातात. कोरोनाच्या संकटाने अगोदरच जनता व प्रशासन त्रस्त आहे. अनेकांचा रोजगार गेला. सर्वांचीच आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सर्वचजण कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोरोना वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी, राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, गावातील वातावरण चांगले रहावे, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणार्‍या खर्चाची बचत व्हावी, यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. याकरिता ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते तसेच नवतरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार राजू पारवे यांनी केले. १५ जानेवारी २0२१ रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाचा विजय होईल, अशा आशा याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी व्यक्त केल्या.
बैठकीला माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सभापती नेमावली माटे, तालुकाध्यक्ष शिवदास कुकडकर, चंद्रशेखर ढाकूणकर, सभापती रमेश किलनाके, पं. स. उपसभापती सुरेश लेंडे, क्रिष्णा घोडेस्वार, जि. प. सदस्य शंकर डडमल, राजू सुटे, सुनीता ठाकरे, गितांजली नागभिडकर, वंदना बालपांडे, पं. स. सदस्य पुष्कर डांगरे, संदिप खानोरकर, नंदा नारनवरे, वंदना मोटघरे, मंदा डाहारे, राहुल मसराम, विठ्ठल राऊत, विठ्ठल हुलके, सुभाष मुळे, मनोज तितरमारे, महादेव जिभकाटे, अरुण हटवार, संजय ठाकरे, संजय वाघमारे, राजेश लोहकरे, ज्योतीकुमार देशमुख, अरुण बालपांडे, अमोल गेडाम, प्रशांत जिचकार, जितेंद्र गिरडकर, सुनील किंदर्ले, किशोर कुर्जेकर, उदय शेंडे, तुळशीदास शेंडे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.