पदवीधर निवडणुकीचा धसका, फडणवीसांचा नागपुरात आठवड्यातून दोन दिवस मुक्काम; पालिका निवडणुकीची तयारी सुरू

Share This News

नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागल्याने भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूर: नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागल्याने भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गडालाच महाविकास आघाडीने सुरुंग लावल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी नागपूर महापालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आता पासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस मुक्काम ठोकणार असून संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर भर देणार आहेत. (devendra fadnavis will review of nagpur corporation election)

पदवीधर निवडणूकीतील पराभवानंतर आता भाजपने सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या ताकदीचा अंदाज आल्याने पुढच्या सर्व निवडणुकांचा भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळेच नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दर आठवड्यातील दोन दिवस नागपुरात मुक्कामी असणार आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणूकीची पूर्व तयारी आणि विदर्भातील पक्षबांधीसाठी फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आहेत. “भाजप नेहमीच निवडणूकीच्या तयारीत असते, नागपूर मनपा पुन्हा जिंकणार आणि विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील ६२ पैकी ५० पेक्षा जास्त जागा जिंकू,” असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

फडणवीस अॅक्शनमोडमध्ये

देवेंद्र फडणवीस आठवड्यातून दोन दिवस नागपूरला देणार आहेत. प्रत्येक विभागात जाऊन त्या विभागाचा आढावा घेतानाच वॉर्डावॉर्डात कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यावर त्यांचा भर असणार आहे. स्थानिक समस्यांचा आढावा घेतानाच नागरिकांशीही ते संवाद साधणार आहेत. बुथ स्तरावर बांधणी, महिला मोर्चा मजबूत करणे आणि तरुणांची फळी उभी करण्यावर त्यांचा सर्वाधिक भर असणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला नागपुरातच महाविकास आघाडीने मात दिल्याने नागपूरचा गड राखण्याची वेळ भाजपवर आल्याचंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

पदवीधर निवडणुकीत काय झालं होतं?

महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला नागपूरमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला होता. नागपूर पदवीधर मतदारसंघ गेल्या 55 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा गड म्हणून नागपूरला ओळखले जाते. पण या गडाला सुरुंग लावण्यात काँग्रेसला यश मिळाले होते. प्रत्येकवेळी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणं, त्यामुळे होणारं नाराजीनाट्य आणि दुसरीकडे भाजपची सुनियोजित रणनीती आदी कारणांमुळे नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा पराभव पत्करावा लागत होता. मात्र, यावेळी काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना दीड वर्षापूर्वीच तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे वंजारी यांनी गेल्या दीड वर्षांपासून कामाला सुरुवात केली होती. त्यातच शिवसेनेची साथ मिळाल्याने भाजपच्या गडाला सुरुंग लावणं त्यांना सोपं गेलं होतं. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. (devendra fadnavis will review of nagpur corporation election)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.