अमरावती – शेतमालाच्या हमीभावासाठी भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

अमरावती, 8 सप्टेंबर

शेतकऱ्यांना शेतमालासाठी हमीभाव देण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार करून ३१ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्याने भारतीय किसान संघाच्यावतीने देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. बुधवार ८ सप्टेंबर रोजी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील जिल्ह्यातील शेतकरी आणि किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या शेत मालाला केंद्र सरकारने घोषणा केल्या प्रमाणे उत्पादन खरचवर आधारित हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, खत,बी-बियाणे यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे मात्र त्या प्रमाणात शेतमालाच्या किमती मात्र वाढलेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित बिघडलं आहे. केंद्र सरकारने गाजावाजा करीत उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची घोषणा केली मात्र त्यानुसार अद्यापही भाव मिळालेला नाही.शेतमालाचा व्यवसाय करणारे व्यापारी,कृषी केंद्र संचालक यांचा मात्र फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळी शेतकरी आणि भारतीय किसान संघाकडून करण्यात आली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.