आपल्या हक्कांसाठी दिव्यांग बुधवारी करणार ठामपात कायदेभंग आंदोलन

ठाणे, 5 सप्टेंबर दीड वर्षांपूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ताबापत्र ठामपाच्या वतीने देण्यात आली आहेत. मात्र, या घरांचा प्रत्यक्ष ताबा अद्यापही देण्यात आलेला नाही. घरांचा ताबा मिळावा, यासाठी दिव्यांगांनी आंदोलन करूनही कार्यवाही होत नसल्याने येत्या बुधवारी (दि. ८) बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेनेच्या वतीने ठामपा मुख्यालयात घुसून कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान यांनी दिली.

दिव्यांगांना बीएसयूपी योजनेतून परवडणारी घरे देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांमधून ४ फेब्रुवारी २०२० रोजी पात्र- अपात्र निश्चित करून ६ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दिव्यांगांना चाव्या देण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सुमारे दीड वर्षांनंतरही काही अपवाद वगळता बहुतांश दिव्यांगांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे , या घरांचा ताबा घेण्यासाठी अनेक दिव्यांगांनी आपल्या भाडेतत्त्वावरील घरांची अनामत रक्कम घेऊन पालिकेत जमादेखील केली आहे. मात्र, बीएसयूपी कक्ष स्थावर मालमत्ता विभागाकडे तर स्थावर मालमत्ता विभाग बीएसयूपी कक्षाकडे जबाबदारी ढकलत आहे. माहिती अधिकारातही दिवा, तुळशीधाम, कासारवडवली, ब्रम्हांड, रिव्हरवूड येथील घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या घरांचा ताबा मिळावा, यासाठी १२ जुलै रोजी दिव्यांगांनी पालिका मुख्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलनही केले होते. त्यावेळेस हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड महिन्यात दिव्यांगांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळेच येत्या बुधवारी सर्व दिव्यांग पालिका मुख्यालयात घुसून कायदेभंग आंदोलन करणार आहेत, असे युसूफ खान यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या दिव्यांगांना ताबा पत्र मिळूनही प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळालेला नाही, अशा दिव्यांगांनी अखिल भारतीय दिव्यांग सेनेशी 91 99878 22946 या क्रमांकावर संपर्क साधून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही खान यांनी केले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.