भ्रष्टाचारासाठी नेत्यांना पवार मार्गदर्शन करतात काय, किरीट सोमय्यांचा सवाल

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांवर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात पुण्यात आल्याचंही ते म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना त्यांनी शरद पवारांना कडवा सवालही केला आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी या नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का? असेही त्यांनी विचारले आहे.
पुण्यात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवार सर्टिफिकेट देत आहेत, ईडी अतिक्रमण करत आहे, ईडी हैराण करत आहे. भावना गवळी निर्दोष आहे. माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे. खासदार भावना गवळींनी  एकूण २५ कोटी रुपयांची कॅश काढली आहे. आणि शरद पवार सांगतात ईडी का चौकशी करतते? ईडीचा कायदा तुम्हीच केला होता तुम्ही मंत्री असताना. मुद्दा कोण चौकशी करत आहे हा नाही पण भावना गवळींनी ५५ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, ५५ कोटी रुपये ढापले आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणारा कारखाना त्यांनी त्यांच्याच कंपनीला हा कारखाना २५ लाखात विकला. तुम्हाला हे ५५ कोटी दिसत नाहीत? की आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करता?
ते पुढे म्हणाले, या प्रकरणाची आम्ही तक्रार केल्यानंतर केंद्र सरकारने ठाकरे सरकारला कळवले की या प्रकरणाची चौकशी करा. या सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि २१ दिवसांच्या आत ही समिती बरखास्त केली. हे पवार साहेबांचे मार्गदर्शन आहे का? शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचे असेल तर पवारांनी जाहीर सांगावे की आम्ही चोरी करणार, लबाडी करणार, लोकांना कीडनॅप करणार. आमचे राज्य आहे, जाहीर सांगावे. आम्ही मान्य करू, तुमचेच राज्य आहे.
शरद पवारांनी कितीही सर्टिफिकेट दिली आणि उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्याला अटक करण्याची मागणी केली, तरी महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करायचे, या घोटाळेबाज सरकारला ठिकाणावर आणायचे आमचे काम सुरूच राहणार, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.