डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ’अटल संस्कृती गौरव पुरस्कार’’; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार प्रदान

पुणे : संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सन्मानपूर्वक दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून,  यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना  ‘अटल गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी ( 25 डिसेंबर) सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे आहे.

कोथरूड मतदार संघाचे आमदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तर  खासदार गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर करणार असून अभिनेत्री भार्गवी चिरमुले नृत्य सादर करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.