तळोजा कारागृहात ईडीकडून सचिन वाझेची सहा तास कसून चौकशी

मुंबई, ११ जुलै : बडतर्फ एपीआय सचिन वाझेची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी तळोजा कारागृहात सहा तास कसून चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून वाझेकडे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. पैसे वसुलीला त्यांची संमती होती का, त्यांच्यासाठी वसुली केली होती, त्यांच्या कामाची पद्धती कशी होती, याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केल्याचे समजते.

दरम्यान या चौकशीत अंबानी निवासस्थानाजवळील स्फोटके, मनसुख हिरेन हत्या, मुंबईतील बार मालकांकडून केलेली हप्तावसुली आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप या प्रकरणांचा समावेश होता. तर अखेरच्या टप्प्यात वाझेंसोबत संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

परमबीर सिंग यांच्या आरोपांची व्याप्ती मोठी

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन आयुक्त आणि इतरांची जबाबदारी निश्चित करण्याची सूचना सीबीआयला केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्राथमिक अहवालावरून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेल्या ईडीने या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तथा आरोपी वाझेकडे सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाने तीन दिवस तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी अधिकाऱ्यांचे एक पथक तळोजा तुरुंगात गेले. वाझेला बराकीतून भेट कक्षातील स्वतंत्र दालनात आणण्यात आले.

विविध संदर्भात घेतला सविस्तर तपशील

त्याने सीबीआयला दिलेल्या जबाबात डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७० कोटी रुपये वसूल करून तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांच्याकडे पोहचल्याचे नमूद केले होते. त्या अनुषंगाने त्याच्याकडून सविस्तर तपशील जाणून घेण्यात आला. ती रक्कम कोठून कशी घेतली, कोणाच्या हवाली केली याबद्दल जबाब नोंदवून घेण्यात आला. वसुलीबद्दल गृहमंत्री, आयुक्तांनी काय काय सूचना दिल्या होत्या, याबाबत सायंकाळी चार वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर पथक कारागृहाबाहेर आले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.