माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीची लूक आऊट नोटीस

मुंबईः मनी लॉन्डरिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध अखेर अंमलबजावणी संचालनालयाने लूक आऊटची नोटीस जारी केली आहे. देशमुख यांन देश सोडून जाऊ नये, यासाठी ईडीने ही नोटीस जारी केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून महाराष्ट्रात गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तिविरुद्ध अशी नोटीस निघण्याचा बहुदा हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलले जात आहे.
ईडीकडून देशमुख कुटुंबीयांच्या आरथिक व्यवहारांचा शोध सुरु आहे. गृहमंत्री पदावर असताना देशमुख यांना वेगवेगळ्या बार मालकांकडून सुमारे ४.७ कोटी रुपयांची रक्कम अवैधरित्या मिळाली, असा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या मार्फत ही रक्कम त्यांच्या नागपुरातील साई शिक्षण संस्थेला मिळाली, असा ईडीचा दावा आहे. या चौकशीविरुद्ध देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, देशमुख यांनी ईडीची चौकशी रद्द करण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्यावरील आरोप चुकीचे असून व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले बयाण नोंदविण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी सातत्याने केली आहे. या प्रकरणाशिवाय मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. आजवर ईडीने पाच समन्स बजावूनही देशमुख चौकशीसाठी हजर न झाल्याने आता ईडीला लूक आऊट नोटीस जारी करावी लागली आहे. देशमुख यांनी देशबाहेर जाऊ नये, यासाठी ईडीने ही नोटीस जारी केली आहे. ईडीने देशमुख यांना अटक करण्याची तयारी सुरु केली असल्याचे बोलले जात असून त्यासाठी त्यांचा शोध सुरु आहे. ३ सप्टेंबर रोजी सीबीआयने देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली. सीबीआयची गोपनीय कागदपत्रे मिळवून तपासावर प्रभाव पाडल्याचा आरोप अड डागा यांच्यावर आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.