राहूल गांधींना राष्ट्रीय नेता म्हणणे बैलांनाही आवडलेले दिसत नाही- देवेंद्र फडणवीस


नागपूर : ‘राहूल गांधींना राष्ट्रीय नेते म्हणणे बैलांनाही आवडलेले दिसत नाही’ असा टोला राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे लगावला. काँग्रेसच्या वतीने मुंबईत भाई जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात बैलबंडी तुटल्यासंदर्भात नागपूर विमानतळावर पत्रकारांनी फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हा टोला लगावला. तसेच काँग्रेसच्या आंदोलनाला यावेळी शुभेच्छा देखील दिल्या.
राज्यात पाणी अडविण्याच्या बाबतीत राज्य सरकार आज जे काही सांगत आहे, ते निर्णय मी मुख्यमंत्री असतानाच घेतले असल्याचे सांगतांना त्यांचा डीपीआरही तेव्हा पूर्णत्वास आला होता. त्यामुळे तो डीपीआर निश्चित करून त्याच्या निविदा काढायच्या आहेत, त्यात कुठलेही नवीन काम नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्वप्नील लोणकर आत्महत्ये विषयी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘एमपीएससी’च्या संदर्भात सरकार गंभीर नाही आहे. स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीने सरकार जागे व्हायला पाहिजे होते, तसे झालेले नाही. सरकार केवळ घोषणा करीत आहे, पण घोषणा करून लोणकर यांच्या कुटुंबियांना दिलासा देता येणार नाही. दुसरीकडे ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे एकही काम सरकारने अद्याप केलेले नाही. पोकळ घोषणा करण्याऐवजी सरकारने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी ठोस काम करायला हवे. मात्र, या घटनेनंतरही सरकार घोषणांच्या पलीकडे गेले नसल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. ओबीसी नेते हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे, याविषयी विचारले असता, ‘हरी नरके यांच्याशी मी काय चर्चा करणार, पण त्यांचे ‘बॉस’ अर्थात छगण भुजबळ यांच्याशी चर्चा करायला मी केव्हाही तयार आहे.’असे फडणवीस या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष निवडणुकी संदर्भात बोलतांना त्यांनी सांगितले की, महाविकासआघाडीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत एकमत असते तर आतापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लावली असती, त्यांच्यात एकमत नसल्यामुळेच निवडणूक होऊ शकली नसल्याची टिकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.