चंद्रपूर : रब्बी हंगामातील पिकांकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ

पीक स्पर्धेतील पिके
खरीप पिके : भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयबीन, भुईमुग, सुर्यफुल.
रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकर्‍यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना पीकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान १000 हेक्टर असावे. स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या : पीक स्पर्धेसाठी पूर्ण तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १0 शेतकरी आणि आदिवासी गटासाठी पाच शेतकरी. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान १0 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी पाच व आदिवासी गटासाठी चार राहील.
स्पर्धेतील भाग घेणारे शेतकरीकरिता अटी व शर्ती – पिकस्पर्धेसाठी सर्व शेतकर्‍यांना भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेतांना शेतकर्‍यांकडे त्यांच्या नावावर जमीन असली पाहिजे व जमीन तो स्वत: कसत असला पाहिजे. स्पर्धेत भाग घेणार्‍या शेतकर्‍याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
अर्ज दाखल करण्यासाठी तारीख रब्बी हंगाम – ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ पिकाकरीता ३१ डिसेंबर राहील.
पीकस्पर्धेत विजेत्यांना तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर बक्षीस देण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील प्रथम बक्षीस ५0 हजार, द्वितीय ४0 हजार तर तृतीय बक्षीस ३0 हजार रुपये राहणार आहे. तसेच विभाग पातळीवर अनुक्रमे २५ हजार, २0 हजार व १५ हजार, जिल्हा पातळीवर १0 हजार, सात हजार, व पाच हजार, तालुका पातळीवर पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयाचे बक्षीस सत्कार समारंभात देण्यात येईल.
वरीलप्रमाणे पीक स्पर्धेत भाग घेवू इच्छिणार्‍या स्पर्धकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रवेश शुल्क व सात-बारा उतार्‍यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचेकडे पाठवावे. अधिक माहितीसाठी संबंधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.