राजकारण करत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

‘मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील लोकांना आधी शिकवावे’

मुंबई : राज्यात मंदिरे उघडण्यासाठी करण्यात येणार्‍या आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत विरोधकांना सुनावले होते. ते म्हणाले होते की, अनेकांनी राज्यात मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलने केली. तुम्ही आंदोलने करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचे आहे. असे व्हायला नको. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस याला उत्तर देताना म्हटले की, ‘मुख्यमंत्री काय बोलले यावर काही बोलणार नाही. समोरच्यांना बोलण्याऐवजी आपल्या पक्षातील लोकांना शिकवावे असा टोला त्यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे असा सल्लाही दिला आहे. महाविकास आघाडी ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली असल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल प्रश्‍न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ईडीने लूकआऊट नोटीस जारी केल्याचे मला आताच कळाले. कायद्याच्या दृष्टीने त्यांनी चौकशीला सामोरे जावे हेच योग्य होईल. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याबाबत धाव घेऊन झाली आहे. आता चौकशीला सहकार्य करावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
महाविकास आघाडी ही सरकार चालविण्यासाठी तयार झालेली नाही. आघाडी तयार झालीय ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी. प्रत्येकजण सरदार असल्यासारखे वागतोय. जर सत्तेचे लचके तोडता आले नाही तर एकमेकांचे लचके तोडा असेही फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान, बीडमध्ये करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्‍न विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचे कारण नाही. पिस्तुल ठेवल्याचा व्हिडीओ आणि त्यानंतर मिळालेली पिस्तुल हे गंभीर आहे. कोणत्याही दबावाशिवाय करुणा शर्मा पिस्तुल प्रकऱणाची चौकशी झाली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.