
शहाणे लोक शब्दच्छल करीत बसतात,श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको हे म्हणणे म्हणजे बियर चांगली पण दारू नको म्हटल्यासारखे आहे. काही महाभाग डोळस श्रद्धा असाही शब्दप्रयोग करतात,तोही फसवाच म्हटला पाहिजे.श्रद्धा प्रक्रियेत डोळस,चिकित्सा ,प्रश्न,संशय,असे काहीही नसते,किंबहुना ती कुणावर ठेवायला सुरुवात केली तर आपल्या मेंदूतील तर्काचा कप्पा हळूहळू लुळा,अधू व्हायला आणि काही काळाने तो कामच करणे बंद करतो,दारू जास्त प्रमाणात पिल्यावर व्यक्ती जशी निर्णयक्षमता गमावून बसतो तीच ताकद श्रद्धेत असते.
भोंदू खरात बाबा यांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी ज्या चित्रफिती पुढे आल्या त्यात पीडित स्त्रिया ज्या पद्धतीने पुढाकार घेताना दिसतात,ते बघून त्यांच्यावर जबरदस्ती झाली नाही असा तर्क कुणीही काढू शकतो, हा साठ वर्षाचा म्हातारा फार चपळ आणि अधाशी आहे,असेही दिसत नाही मग स्त्रिया स्वतःहून त्याच्या कडून योनी शुद्धीकरण करण्यास तयार का झाल्या ? याचे उत्तर आपल्या प्रत्येकाच्या संस्कारात दडलेले आहे,धर्म,समाज आणि कुटुंबात वावरताना कळत न कळतपणे होणारे संस्कार पक्के होतात.श्रद्धा ठेवावी याचा चारीबाजूने सतत मारा होत असतो. कुणात तरी दैवी,अलौकिक शक्ती असते हा विश्वास त्यातून बळकटहोतो.पाप,पुण्य,स्वर्ग,नरक ,साडेसाती,करणी,वाईट शक्तींचा संचार हे खरे वाटायला लागते कारण ते नाकारणारे कुणी आजवर भेटलेले नसते. आपले जीवन नियंत्रीत करणारी कुठलीतरी शक्ती असते हे मिथक डोक्यात पक्के बसलेले असते आणि जीवनात आलेली संकटे दूर करणाऱ्या व्यक्ती धार्मिक क्षेत्रात असतात हा भरोसा आपला पाय आणखी खोलात नेतो,त्यात श्रद्धा अतिशय महत्वाचे काम करते.श्रद्धेत संशय नको ही या प्रक्रियेची पहिली अट असते,इथेच घात होतो कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण ते डोक्यात शिरत नाही.
शहाणे लोक शब्दच्छल करीत बसतात,श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको हे म्हणणे म्हणजे बियर चांगली पण दारू नको म्हटल्यासारखे आहे. काही महाभाग डोळस श्रद्धा असाही शब्दप्रयोग करतात,तोही फसवाच म्हटला पाहिजे.श्रद्धा प्रक्रियेत डोळस,चिकित्सा ,प्रश्न,संशय,असे काहीही नसते,किंबहुना ती कुणावर ठेवायला सुरुवात केली तर आपल्या मेंदूतील तर्काचा कप्पा हळूहळू लुळा,अधू व्हायला आणि काही काळाने तो कामच करणे बंद करतो,दारू जास्त प्रमाणात पिल्यावर व्यक्ती जशी निर्णयक्षमता गमावून बसतो तीच ताकद श्रद्धेत असते. कुटुंबातील समस्या अश्या भोंदूना आपण अगोदरच सांगून ठेवल्या असतात,आपण कसे अगतिक झालो आहोत आणि त्यातून मुक्तीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवलेली असते,अशावेळी श्रद्धा मेंदूचा ताबा घेते आणि मग महाराज,स्वामी,बाबा किंवा श्रद्धेय जे सांगतील तो केवळ उपचार म्हणून पार पाडला जातो.खरात पुढे हेच श्रद्धा कर्तव्य करताना ह्या मानसिक आजारी महिला दिसत आहेत.
श्रद्धा उच्चशिक्षित व्यक्तींना सुद्धा पशुवत करू शकते,श्रद्धेचा कोमा भयंकर वाईट अवस्थेपर्यंत कुणालाही नेऊ शकतो याची असंख्य उदाहरणे मला माहित आहेत. श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत कधी होते हे कळत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा आपल्या अभेद्य किल्ल्याला भगदाडे पडलेली असतात.
समाजात लोकांना विविधांगी प्रचंड समस्या आहेत,त्यांनी त्या स्वतःच्या हाताने आणि वागणुकीने निर्माण केलेल्या असतात. गरजेपेक्षा जास्त धन संचयाची आसक्ती ,पैसा कमावण्याची भयंकर ओढ व्यक्तीला कोणत्याही एका वळणावर थांबवत नसते कारण आजवर कधीच कुणाला कमावले एवढे पुरे आहेत आता बस असे वाटत नसते. कोणत्याही बाबीची हाव व्यक्तीला उत्तम माणसाच्या पातळीवर उभे राहू देत नसते ,त्यातून कमावत्या व्यक्तीच्या कुटुंबात असंख्य प्रश्न मोठे वाहायला लागतात. त्याची सोडवणूक करण्यासाठी मग समाजात कुण्यातरी सिद्ध पुरुषाचा शोध सुरु होतो ,असे कथित सिद्ध पुरुष सध्याच्या घडीला दर दोन कोसांवर कुणाची तरी वाट बघत बसलेले असतात.
अध्यात्म किंवा धार्मिक क्षेत्रात नव्याने शिरणाऱ्या सगळ्याच व्यक्तींची तर्कबुद्धी कार्यरत असते ,कालांतराने या क्षेत्रात तर्काचा वापर करण्याची गरज नाही याची शिकवण वेळोवेळी दिली जात असल्याने त्याचा दीर्घकाळ वापर केला जात नाही कारण शंका,प्रश्न आणि चिकित्सा या गोष्टी कोणत्याही धार्मिक क्षेत्रात वर्ज्य असतात त्या कायम राहिल्या तर व्यक्ती कुठेच श्रध्द ठेवू शकत नसल्याचे मनावर बिंबवले जात असते म्हणून धार्मिक क्षेत्र किंवा कोणत्याही पंथात काम करणारे अनुयायी त्याचे तंतोतंत पालन करीत मेंदूतील तर्काचे काम करणाऱ्या कप्प्याला कायमचे बंद ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. धर्मशास्त्रात पारंगत व्यक्तींना स्वतःवरील आरोपात युक्तिवाद करता येतो मात्र जेव्हा ते करीत असलेल्या कामांवर संशय व्यक्त केला जातो तेव्हा त्यांना त्याची उत्तरे मिळत नाहीत,आपल्या कामावर संशय व्यक्त करणारे लोक किंवा विचार शत्रू वाटायला लागतात . सगळ्याच धार्मिक पंथात आजवर हेच घडत आले आहे.
धार्मिक मान्यता आणि आपल्यावर झालेले संस्कार एवढे टणक बनत जातात की आपण करीत असलेल्या चुकीच्या कामांची जाणीव ते होऊ देत नाहीत. नागपुरात जेव्हा स्वतःला जगतगुरु समजणारा कृपालू महाराज याला महिलांच्या लैगिक शोषणात अटक झाली तेव्हा त्याला पोलीस कोठडीत पंचपक्वानाचे डबे नेणाऱ्यात महिलांचे प्रमाण मोठे होते. आजही अल्पवयीन माऊलीच्या बलात्कारात जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या समर्थनार्थ देशभरात महिलांचे मोर्चे निघतात आणि आसाराम निर्दोष असल्याची ओरड होते तेव्हा श्रद्धा कशी आणि किती प्रमाणावर मेंदूवर परिणाम करते याचा अंदाज येतो. आजवर आपल्या देशात हजारो बुवा बाबानी अल्पवयीन मुली आणि स्त्रियांचे लैगिक शोषण केले त्यात अनेकांना शिक्षा झाली असली तरी बहुतांश बाबा त्यातून सहीसलामत सुटल्याचे आपण बघितले आहे. त्यामागे अनुयायांनी त्यांचा धर्माशी जोडलेला संबंध हे एक मोठे कारण समोर आले आहे.
धार्मिक क्षेत्रात पैसा ,सन्मान आणि स्त्रिया यांचे प्रमुख आकर्षण असल्याने त्यात जम बसविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठी का असते याचा कधी विचार केला तर समाजातील मोठे सत्य कदाचित नजरेस पडते. आजच्या काळातही लाखो लोकांच्या व्यक्तिगत जीवनात असलेल्या असंख्य समस्यांपैकी लैगिक असमाधान असते , असे भोंदू तेच नेमके हेरत असतात. श्रीमंत ,धनिक घरातील महिलांना हेरून त्यांच्या लैगिक अतृप्तीवर नेमके बोट ठेवतात आणि सुलभ हप्त्याने त्यांचे विविध प्रकाराने शोषण करीत असतात. सग्लेसिक्सह बुवा बाबा हेच करतात . जो पकडला जातो त्याची लफडी बाहेर येतात आणि ज्या महिलांमध्ये डेरिंग नसते त्या वर्षनुवर्षं हे सगळे अत्याचार मुक्तपणे सहन करीत राहतात. कोणत्याही बाबाकडे गेल्यावर अनेक आजार बरे होतात हे सत्य साले तरी त्यात त्या बाबाची कोणतीही करामत नसते ,आश्रम, मंदिर आणि भजन ,प्रवचन यात भाविकांचे मन रमत असल्याने त्याचा मोठा मानसिक परिणाम होऊन काही आजार कमी व्हायला मदत होत असली तरी त्यामुळे बाबाला त्याचा मोठा लाभ होत असतो.
आपल्याला होत असलेल्या आजारांपैकी ५० टक्के आजार सायकोसोमॅटीक असतात याची बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे पन्नास टक्के आजार उत्तम मनशांती लाभली तरी बरे होऊ शकतात हा त्याचा अर्थ आहे. इतरांकडून एखाद्या बाबाची महती ऐकलेली असते त्यामुळे तिथे गेल्यावर आपण सजेशन स्वीकारतो आणि काही मानसिक आजारात थोडेफार समाधान मिळते मात्र त्याचे श्रेय भोंदू बाबाना जात असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा ,तुमचे स्वतःचे आणि कुटुंबातले वातावरण शांत,आनंदी आणि सकारात्मक ठेवा अश्या वातावरणात तुमच्या मानसिक आजाराचे औषध लपलेले असते.
– पुरूषोत्तम आवारे पाटील
संवाद :9892162248















