चंद्रपूर : जादूटोण्याच्या संशयावरून चंद्रपुरात कुटुंबीयांना मारहाण

जिल्ह्यात १५ दिवसांतील तिसरी घटना : सहा अटकेत

चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. शनिवारी (४ आॅगस्ट) चंद्रपुरातील भिवापूर परिसरात अशीच एक घटना उजेडात आली आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून सहाजणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपी आणि पीडित नातेवाईक आहेत.
 चंद्रपुरातील भिवापूर परिसरात लालबहादूर शाळेजवळ पडदेमवार कुटुंबीय वास्तव्याला आहेत. याच कुटुंबातील राम पडदेमवार हे कॅन्सरने ग्रस्त आहे. दरम्यान, जादूटोणा केल्यानेच राम पडदेमवार यांना कॅन्सर झाल्याचा संशय घेत राम पडदेमवार यांनी नातेवाईकच असलेले पूजा पडदेमवार व तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली़ दरम्यान, पूजाने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ जिवती तालुक्यातील वणी खुर्द आणि नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील जादूटोणाच्या घटनांची शाई ओलीच असताना थेट महानगरात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.  तक्रारीवरून आशालू पडदेमवार, नरसिंग पडदेमवार, मधनूबाई राधन्नी, रवी आशावार, मंगेश पडदेमवार, सिन्नू राधन्नी यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायदा ३, २ आणि भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पुढील तपास ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस करीत आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.