सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू

भंडारा
लाखनी तालुक्यातील सोमलवाडा येथे घरालगत असलेल्या गोठय़ातील म्हशींना तणीस टाकत असतांना विषारी सापाने शेतकर्‍याला दंश केला. यात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली. राजेश प्रभू लुटे (३२) रा.सोमलवाडा असे मृतकाचे नाव आहे.
रात्री जेवण आटोपल्यानंतर गोठय़ात बांधलेल्या म्हशींना चारा म्हणून तणीस टाकत असतांना विषारी सापाने राजेशच्या डाव्या हाताला दंश केला. सर्पदंश झाल्याने अस्वस्थ वाटत असल्यामुळे व प्रकृती गंभीर होऊ नये म्हणून घरच्या मंडळींनी तत्काळ लाखनी येथील खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन ग्रामीण रुग्णालयात हलविले.
प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर होत असल्याने वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे नेत असतांना रविवारी सकाळी ६ वाजता दरम्यान राजेश यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, पाच वर्षीय मुलगी व दोन वर्षीय मुलगी आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास पोलिस हवालदार दिगांबर तलमले करीत आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.