स्त्री विचार.

समाजात मुलींवरील वाढत्या अत्याचाराला निदान पंचेवीस टक्के तरी मुलीच दोषी असल्याचे विधान राज्य महिला आयोगाच्या एका सदस्या डॉ. आशाताई मिर्जे यांनी केले आहे.
तसं म्हटलं तर यात नवीन काहीच नाही आणि म्हटलं तर सखोल अभ्यास आणि सुक्ष्म निरीक्षणाअंती त्यांनी काढलेला तो निष्कर्ष असल्याचेही म्हणता येईल.
संस्कारांची जोड देत ज्या भावनांना सभ्य आचरणाच्या चौकटीत बांधून ठेवण्याचे प्रयत्न इतके दिवस झालेत, ती बंधनं आता सैल होऊ लागली आहेत. या परिस्थितीला जोड मिळतेय्‌ ती चित्रपट, दूरचित्रवाहिन्या, इंटरनेटसारख्या विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध होणार्‍या माहितीची. वेल्थ, वूमन आणि वाईनच्या भोवती फिरणार्‍या समृद्धीच्या गैरसमजांची. तिथेच घुटमळणार्‍या चैनीच्या कल्पनांची आणि मुळातच स्त्रीकडे बघण्याच्या सामाजिक नजरेची.
एकदा तरुण भारतच्या वार्ताहरांची एक बैठक सुरू होती. विषय निघाला एका गावातल्या बलात्काराच्या एका प्रकरणाचा. त्या घटनेचे वृत्तांकन म्हणावे तसे समाधानकारक झाले नसल्याचा निषकर्ष काढण्यात आला होता. तो त्याच्या पद्धतीने त्याचे स्पष्टीकरण देऊ लागला. तशीही ती महिला काही फार सुसंस्कृत नव्हती. वेश्याव्यवसाय करायची ती. तिच्यावरील बलात्काराला काय एवढे महत्त्व द्यायचे, असा सवाल करत त्या अत्याचाराचे आडमार्गाने समर्थन होत असल्याचे बघून तत्कालीन संपादक अक्षरश: संतापले. वेश्याव्यवसायाचे समर्थन न करण्याची भूमिका एकवेळ समजता येईल पण म्हणून तिच्यावरील बलात्काराचे समर्थन कसे करता येईल, या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही त्या वार्ताहाराला देता येईना. बैठकीनंतर ती चर्चा तिथेच संपली पण महिलांकडे बघण्याची एक नवी दृष्टी संपादकांच्या त्या भूमिकेतून उपस्थित प्रत्येकालाच मिळाली होती. एखादी महिला वेश्या व्यवसाय करते म्हणून काही तिच्यावर बलात्कार करण्याचा परवाना कुणाला प्राप्त होत नाही, ही त्यांची कणखर भूमिकाही मनात  कायमची घर करून बसली.
कुठल्याही दुर्बल सामाजिक घटकांवर अन्याय, अत्याचार होऊ न देण्याची नैतिक जबाबदारी त्या समाजातील, स्वत:ला सबल म्हणवून घेणार्‍या घटकांची असते. पण अलीकडच्या काळात स्त्रीयांच्या बाबतीत या जबाबदारीचे निर्वहन पुरूष नामक घटकाने पार पाडल्याचे चित्र सहसा बघायला मिळत नाही. नर आणि मादीच्या पलीकडेही स्त्री-पुरूषांमधले संबंध असू शकतात, याची शिकवण देणार्‍या संस्कारांची आज गरज आहे. मुलींना सातच्या आत घरात परतण्याची सक्ती घालणार्‍या माय-बापांना कधी आपल्या मुलालाही चार गोष्टी सांगाव्याशा वाटल्या पाहिजे. आपल्या बहिणीला लोकांच्या भीतीपोटी सातच्या आत घरात येण्याची गरज पडणार नाही, असे वर्तन प्रत्येकानेच समाजातील इतर मुलींशी केले तरच ही परिस्थिती सुधारेल.
दुर्दैवाने आजार एक आणि उपचार भलतेच सुरू आहेत. मुलींनी अंगावर धारण केलेल्या तोकड्या कपड्यांचा परिणाम मुलांच्या भावना चाळवल्या जाण्यात होत नाही असे कोण म्हणेल? चित्रपटातल्या अंगप्रदर्शनाचे, सध्या सर्वदूर फोफावलेल्या स्वच्छंदी जीवनपद्धतीचे परिणाम शहरातल्या बागेत, तळ्याकाठी, समुद्रकिनारी बसलेल्या जोडप्यांच्या प्रणयदृश्यांमधून दिसताहेत. एक दिवस पोलिसांनी धाड टाकून पन्नास-शंभर जोडपी ताब्यात घेतल्याने, त्यांना आई-वडिलांच्या हवाली करून ‘सांभाळा तुमची मुलं’ असं म्हटल्याने हे प्रश्नं सुटतील असं मात्र नाही.
वैयक्तिक जीवन कसे जगायचे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे मान्य केले, त्याबाबत कुणी कुणावर निर्बंध घालण्याचा प्रश्न नसला, तरी सामाजिक जीवनाबाबतचे निर्बंध प्रत्येकाला पाळावेच लागतील असे ठणकावून सांगणार्‍या कठोर कायद्यांचीच वानवा असलेल्या समाजात पोरी बारमध्ये नाचवल्या गेल्या काय अन्‌ चार जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला काय, कुणाचे काय बिघडते इथे?  
इतर जातीतल्या मुलावर प्रेम करणार्‍या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचे आदेश देणार्‍या पश्चिम बंगालातल्या एका गाव पंचायतीतल्या कथित न्यायाधीशांची बुरसटलेली मानसिकताच बलात्काराच्या घटनांच्या मुळाशी दडली आहे. या मुलीचा काय दोष होता? तिने तर तोकडे कपडेही घातले नव्हते की अंगप्रदर्शन करत गावातल्या चौकातून ती िंहडली नव्हती. मग का बलात्कार झाला तिच्यावर? फक्त मुलगी म्हणूनच ना? तिच्यावर प्रेम करणार्‍या मुलाला कोणती शिक्षा झाली? दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात तरी काय वेगळे घडले होते? त्यातल्या पीडित मुलीने तरी यातले काय केले होते?
फॅशनच्या नावाखाली सर्वाजनिकरित्या चाललेले अंगप्रदर्शन आणि तोकड्या कपड्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आशाताईंचे अभ्यासपूर्ण निरीक्षण नाकारण्याचेही प्रयोजन नाही. बलात्काराच्या घटनांसाठी या बाबी काही प्रमाणात कारणीभूत असल्याची बाबही मान्य. पण तरीही ही कारणमीमांसा तोकडी आहे असे वाटते.
ढळत चाललेला संस्कारांचा बुरूज नव्याने सावरण्याची गरज प्रकर्षाने जाणवत असली तरी ती कुठेच व्यक्त होताना दिसत नाही. बलात्काराच्या नुसत्या कल्पनेनेही अंगाचा थरकाप उडावा असे कठोर कायदे अस्तित्वात अन्‌ अंमलात आणण्याची भाषा कोणीच बोलत नाही. जबाबदार सामाजिक वर्तनाचे भान मुलांना आणि मुलींनाही शिकवण्याची आवश्यकता कुठेच प्रतिपादीत होत नाही. फक्त आपल्या घरातली मुलगी सुरक्षित राहिली की संपलं, एवढ्या मर्यादीत विचारांनी मुलींना निर्भयपणे वावरता येण्याजोगे वातावरण निर्माण करता येणार नाही कुणालाच.
मध्यंतरी एका सोशल साईटवर एका अमेरिकन नागरिकाने टाकलेली एक अतिशय बोलकी कॉमेण्ट वाचायला मिळाली. एका भारतीय नागरिकाने टाकलेल्या अश्लील पोस्टवर त्याने आक्षेप नोंदवला होता. भारतीय सरकार कायद्याने हे अडवत का नाही, असा त्याचा सवाल होता. ज्यांना आपण स्वच्छंदी, मानवी जीवनाचा अर्थ उपभोगवादाच्या पलीकडे न उमगलेले, म्हणूनच वाया गेलेले समजतो, त्या पाश्चिमात्य माणसालाही खटकावे असे वर्तन सभ्य संस्कृतीचा ताज डोक्यावर कायम मिरवणार्‍या भारतीय नागरिकाकडून घडले होते. याची खंत ज्या दिवशी प्रत्येकाला वाटेल, प्रत्येक जण कागदावरील कायद्यांच्या पलीकडे स्वत: साठी काही वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनाची, सद्विचारांची बंधने घालून घेईल, त्यादिवशी बलात्काराच्या घटनांवर आपसूकच आळा बसेल….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.