जिल्हा परिषदेत लवकरच ‘फाईल ट्रॅकिंग’

नागपूर
काही कामचुकार कर्मचार्‍यांमुळे शासकीय कामात लेटलतीफपणा होत असते. त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर नियंत्रण आणता यावे व कामात होणारी दिरंगाई बंद होऊन सुसूत्रता व पारदर्शकता राहावी, याकरिता नागपूर जिल्हा परिषदमधील सर्व कक्ष आता लवकरच ‘फाईल ट्रॅकिंग’ प्रणालीने जोडण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. जि.प. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी प्रशासकीय कामात आमुलाग्र बदल करण्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले असून या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एखादे सरकारी काम करण्यासाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात. एवढे करूनही हे काम वेळेत होईल याची शाश्‍वती नसते. त्यामुळेच सरकारी काम अन् सहा महिने थांब, ही म्हण जन्माला आली असावी. कामासाठी आलेल्या व्यक्तीला अनेकदा कार्यालयाच्या हेलपाट्या खाव्या लागतात. यासाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांवर दोष देण्यात येतो. मात्र, अनेकदा कागदपत्रांची पूर्तता होत नाही. यामुळेही कामात दिरंगाई होते. अशामुळे नागरिकांना शासकीय कामात वारंवार हेलपाटे खावे लागते. कर्मचारीही अनेकदा पैशांच्या मागणीसाठी फाईल प्रलंबित ठेवीत असल्याचे काही प्रकरण समोर येतात. यावर नियंत्रण आणता यावे व कामात सुसूत्रता आणून पारदर्शकतेने कामे सुरळीत व्हावी, याकरिता कुंभेजकर हे लवकरच जि.प.मध्ये ‘फाईल ट्रॅकिंग’ व ‘ई-टपाल’ प्रणाली अस्तित्वात आणत आहेत. कुंभेजकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या साडेआठ महिन्यात त्यांनी विविध नवनवीन उपक्रम राबवून सामान्य नागरिकांना न्याय कसा देता येईल, प्रलंबित प्रकरणे निकाली कशी काढल्या जातील, यावर भर दिला आहे.

आता लवकरच फाईल ट्रॅकिंग व ई-टपाल प्रणालीत जि.प.तील सर्व विभाग जोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. याचे नियंत्रण त्या-त्या विभागाचे विभाग प्रमुख तथा खुद्द सीईओ करणार आहे. ही संपूर्ण फाईल ट्रॅकिंगची प्रणाली एका ‘बारकोड’ वर आधारित असणार आहे. यासाठी लवकरच सर्व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण (ट्रेनिंग) ही होणार आहे. संगणकावर संबंधित विभागातील कार्यरत कर्मचार्‍यांचे युजर नेम व पासवर्ड तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्या कर्मचार्‍याकडील प्रकरणांची नोंद संगणकावर घेण्यात येणार आहे. फाईलची वर्गीकरणानुसार नोंद होणार आहे. यामुळे सरकारी काम अन् सहा महिने थांब या म्हणीचे रूपांतर सरकारी काम अन् मिनिटभरच थांब, असे होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.