अखेर मास्टर ब्लास्टर सचिनला झाले व्याघ्र दर्शन,पुन्हा येईन, म्हणत घेतला ताडोबाचा निरोप

चंद्रपूर : गेल्या चार दिवसांपासून चिमूर येथील बांबू रिसॉर्टवर येथे मुक्कामी असलेल्या मास्टर ब्लास्टर भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, पत्नी डॉ. अंजली व मुलीला अखेरच्या दिवशी मंगळवारी ताडोबात व्याघ्र दर्शन झाले. त्यांनी ‘छोटी राणी’ या वाघीणीचे दर्शन घेतल्यावर मंगळवारी ताडोबाचा निरोप घेतला.
सात महिन्यांच्या अंतराने दुसऱ्यांदा ४ सप्टेंबरला पुन्हा सचिन तेंडूलकर, पत्नी डॉ. अंजली, मुलगी व मित्रांसह ताडोबात आले होते. पहिल्या तीन दिवसात सफारी केल्यानंतरही वाघाने हुलकावणी दिली. मात्र, शेवटच्या दिवशी छोटी राणीच्या दर्शनाने सचिन व त्याचे कुटुंब आनंदीत झाले. ताडोबात शनिवारी आगमन झाल्यानंतर चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टवर काही वेळाच्या विश्रांतीनंतर मदनापूर गेटवरून ताडोबा सफारी केली होती. मात्र, वाघाचे दर्शन झाले नसल्याने रविवारी अलिझंजा गेटवरून सफारी केली. तरीही वाघ दिसला नाही. त्यामुळे पुन्हा सफारीचा मार्ग बदलवून रविवारी शिवणी जवळील सिरकाडा गेटवरून बफर झोन क्षेत्रात सफारी केली. या भागात वाघाचे दर्शन दुर्मिळच होत असल्याने सचिनलाही वाघ पहायला मिळाला नाही.
सतत दोन दिवस वाघाने हुलकावणी दिल्यानंतर सोमवारी झुनाबाईसाठी मदनापूर गेटवरून सकाळी व सायंकाळी बफर क्षेत्रात भ्रमंती केली. मात्र, वाघाची कुठेही सायटिंग झाले नाही. रविवारी बिबट, हरीण दिसल्याचे सचिन तेंडूलकर यांनी सांगितले. यावेळी सचिनसोबत क्रिकेटपटू सुब्रतो बॅनर्जी, जगदीश फैजल पत्नीसह उपस्थित होते. मंगळवारी अखेरच्या दिवशी सकाळी ६ वाजता मदनापूर गेटमधून सफारीसाठी गेले असता छोटी राणी व पाटलीन बाईचे दोन बछडे, ८ रानकुत्रे दिसल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सांगितले. दरम्यान, भारतीय क्रीकेट संघाने कसोटी जिंकल्याबद्दल काय वाटते, अशी विचारणा केली असता भरपूर आनंद असल्याचे सांगत भारत जिंकतो तेव्हा खूप आनंद होतो, असे सांगितले. चिमूरची जनता खूप चांगली असून, सहकार्य करतात, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर स्वत: गाडी चालवत ४.३० वाजताच्या सुमारास नागपूरला रवाना झाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.