राज्यातले पहिले शासकीय ‘आयव्हीएफ’ केंद्र नागपुरात

आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु काही समस्यांमुळे काही स्त्रियांच्या गर्भधारणेत अडचणी येतात. त्यांच्यातील वंधत्वाची समस्या सोडवण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पथदर्शी प्रकल्प म्हणून पहिले शासकीय आयव्हीएफ (इन व्रिटो फर्टिलिटी) केंद्र तयार करण्याचे निश्चित केले आहे. ते यशस्वी झाल्यास राज्याच्या इतरही भागात वैद्यकीय शिक्षण खात्याकडून हे केंद्र तयार केले जाईल.

अनुवंशिक व इतर काही कारणाने आई न होऊ शकणाऱ्यांना आयव्हीएफ पद्धतीने उपचार देऊन मातृत्वाचे सुख देता येते. सध्या आयव्हीएफ उपचार पद्धती केवळ खासगी रुग्णालयांत उपलब्ध आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील एकाही रुग्णालयात हे केंद्र नाही. परंतु मध्य भारतातील महिलांना दिलासा देण्यासाठी मेडिकलमध्ये हे केंद्र तयार करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या प्रकल्पासाठी २०२०- २१ या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ९५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून येथे या केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसह इतरही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या सूचनेनुसार कामही सुरू झाले आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडूनही त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

आयव्हीएफ म्हणजे काय?

आयव्हीएफ या उपचार पद्धतीमध्ये, स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्राणू या दोघांचे मिलन शरीराबाहेर केले जाते. या पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांडनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, जास्त बीजांडे तयार होण्याची लस देऊन ही बीजांडे बाहेर काढली जातात. त्यानंतर पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्रजंतूदेखील एका जारमध्ये जमा करून, बीजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो. हे भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जातात. त्यानंतर यातील चांगल्या प्रतीचे भ्रूण हे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात.

सध्या २५ ते ३५ टक्के महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणेस अडचण येऊ शकते. वंधत्वावर आयव्हीएफ पद्धती फायद्याची आहे. परंतु त्यासाठी तज्ज्ञांचे निरीक्षण, अद्ययावत पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत.’’

– डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, नागपूर.

पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूरच्या मेडिकलमध्ये राज्यातील पहिले आयव्हीएफ केंद्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा अभ्यास करून ते इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत तयार केले जाईल.

– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.