नागपूर : कन्हान नदीत बुडून 5 तरुणांचा मृत्यू

नागपूर, 05 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे अंघोळीसाठी कन्हान नदीत उतरलेल्या 5 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलीय. हे सर्वजण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असून ते एका दर्ग्यात दर्शनासाठी आले होते.

यासंदर्भात कामठी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील 12 तरुण स्थानिक गाडेघाट परिसरातील अम्मा का दर्गा येथे दर्शनासाठी आले होते. कन्हान नदीच्या अलिकडे कामठी शहर असून पलिकडे हा दर्गा आहे. दरम्यान या 12 तरुणांपैकी काही जण आज, रविवारी सकाळी 10 वाजता कन्हान नदीत अंघोळीसाठी उतरले. परंतु, त्यांना नदीच्या खोलीचा अंदाज आला नाही. याठिकाणी नदीपात्रात खडक असल्यामुळे पाण्यात अनेक भोवरे असतात. तसेच नदीचा प्रवाह देखील खूप वेगात आहे. त्यामुळे पाण्यात उतरलेले हे तरुण पुन्हा बाहेर आलेच नाहीत. मृतकांमध्ये सय्यद अरबाज (वय 21) ख्वाजा बेग (वय 19) सप्तहीन शेख (वय 20) अय्याज बेग (वय 22) आणि मोहम्मद आखुजर (वय 21) यांचा समावेश आहे. सदर घटनेची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे हे तरुण लांब वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान पोलिस स्थानिकांच्या मदतीने या तरुणांचा शोध घेताहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.