कोमात गेले आहे महाविकास आघाडी सरकार – माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघाती आरोप

भाजपाचे वरिष्ठ नेते , विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर आमदार मुनगंटीवार यांनी रविवारी नागपुरातील राजनगर स्थित शंखनाद न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. राज्याचं सुरु असलेलं सध्याचं राजकारण, विकासाच्या दृष्टीकोनातून महाविकास आघाडी सरकारचं राज्यात सध्या सुरु असलेलं कार्य आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य बदल याबाबत त्यांनी शंखनाद न्यूज चे संपादक सुनील कुहीकर यांच्या सोबतच्या वार्तालापात सविस्तर चर्चा केली. कोरोना काळातील उद्धव ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत बाबत बोलताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरु असलेलं महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वातच राहिलेले नाही. ते पार कोमात गेले आहे. त्यामुळे ते काहीच बोलायला तयार नाही. लोकशाही व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांनी सरकार चालवावे अशी जनतेची अपेक्षा असते. त्याचसाठी मुंबईच्या नरीमन पॉइंट स्थित सचिवालायचे नाव बदलून मंत्रालय केले गेले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सरकार मंत्री नव्हे तर मंत्रालयात बसलेले सचिव चालवत आहेत. कोरोनाच्या वैश्विक महामारीत मुख्यमंत्र्यांनी गरीब आणि गरजू जनतेच्या हितासाठी कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. मात्र दारू विक्रेत्यांसाठी लायसंसमध्ये ५० टक्के सूट दिली , शेतकरी , कष्टकरी , व्यापारी , लघुउद्योजक, फुटपाथ दुकानदार यांच्या साठी कुठलेच पॅकेज सरकारने घोषित केले नाही. एवढंच काय तर एमईआरसीच्या नावावर विजेच्या बिलामध्ये प्रत्येक युनिटमागे पैशांची वाढ करून, आधीच आर्थिक विवंचनेत फसलेल्या लोकांना या सरकारने मृत्युच्या दारात आणून सोडले. शेतकऱ्यांच्या बिलात त्यांना एका पैशाची सूट दिली नाही , त्यामुळे लोकांशी बेईमानी करणारे हे सरकार दीर्घकाळ चालणार नसल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. विरोधी पक्षाच्या जवाबदारीबाबत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले २ दिवसाचे अधिवेशन असताना देखील विरोधी पक्ष म्हणून भाजपाने आपली भूमिका विधानसभेत खंबीरपणे मांडली . मराठा आरक्षण , ओबीसींचे राजकीय आरक्षण , बेरोजगारांसाठी रोजगार , निराधारांसाथी अनुदान , महिलांची सुरक्षा यासारखे अनेक गंभीर मुद्दे घेऊन भाजपाने पूर्ण ताकदीनिशी आपली बाजू विधानसभेत मांडली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल असताना देखील आरोग्य सेवा पुरविण्याच्या बाबतीत देखील हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मोठ्या प्रमाणात मानवी कौशल्य असताना, पीपीई कीट, मास्क आणि औषधांसाठी दुसऱ्या देशांवर हे सरकार अवलंबून राहिले. त्यामुळे राज्यात कोरोना मृत्यूचा टक्का कितीतरी पटीने वाढला. कोरोनामुळे देशातील लाखो लोकांचा रोजगार बुडाला, त्यासाठी बऱ्याच राज्यांनी पुढे सरसावत लोकांच्या मदतीसाठी पॅकेज दिले. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने राज्याचे अर्थचक्र जागेवर आणण्यासाठी कुठलेही पॅकेज घोषित न करून त्यांनी जनतेच्या विश्वासाची माती केल्याचेही ते यावेळी म्हणाले. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना माजी मंत्री मुनगंटीवार म्हणाले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यावर कोर्टात आपली बाजू योग्य रीतीने मांडली नाही. म्हणून न्यायालयाने ओबीसी आरक्षण प्रकरणात विरोधात निर्णय दिला. इम्पीरिकल डाटासाठी केन्द्रावर बोट उचलून महाविकास आघाडी सरकारने अक्षरशः ७ महिने वाया घालवले. एकंदरीतच हे सरकार जनतेबाबत सावत्रपणाची भूमिका घेत असल्याची सणसणीत टिका देखील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.


मुंबई मध्ये होणाऱ्या आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वैचारिक मतभेद असल्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप मनसे सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट आहे. आणि यासंदर्भात सध्यातरी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव समोर आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपा सरकारच्या काळात झालेल्या विकासासाठी त्यांनी जीएसटीच्या क्रांतिकारक निर्णयाला कारणीभूत ठरवताना सांगितले की, मुंबईच्या मेट्रो पासून तर राज्यातील रुग्णालये , एस टी , बस सेवा , पर्यावरण कार्यालय , पोलिस यंत्रणा सर्व विभागात क्रांतिकारी बदल केला . राज्यात बंद असलेली मंदिरं सुरु करण्यासाठी सुरु असलेल्या आन्दोलनाबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, संपूर्ण देशात मोठमोठी मंदिरे भक्तांच्या दर्शनासाठी सुरु करण्यात आली आहेत. मात्र फक्त महाराष्ट्रातच मंदिरांची दारं बंद करण्यात आली आहेत. राज्य सरकार दारूच्या दुकानं सुरु करण्याची परवानगी देताना विचार करत नाही मात्र राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी त्यांना इतका विचार का पड़तो , काही दिवसांपूर्वी नाट्य गृहाचे प्रतिनिधि मंडळ नाट्यगृह सुरु करण्याच्या मागणीसाठी भेटायला गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना नाट्य गृहं सुरू करण्याची पुढची तारीख दिली , त्यामुळे सरकारने मंदिर उघडण्यासाठी देखील तारीख निश्चित करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.