गडचिरोली : भामरागड तालुक्यात 100 टक्के सामूहिक वनहक्क दावे मंजूर

Share This News

गडचिरोली, 18 फेब्रुवारी :  भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावे बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा या गावातील लोकांनी मागील 8 ते 9 वर्षापासून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमांतर्गत सामुहिक वन हक्क मिळण्यापासून वंचित होते. अखेर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लक्ष घालून तसेच भामरागड येथे प्रत्यक्ष भेट देवून या विषयला अंतिम स्वरूप प्राप्त करून दिले. १७ फेब्रुवारी रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदाल यांचे हस्ते संबंधित गावातील लोकांना सामुहिक वनहक्क पट्टे बाबात पत्र देणेत आले.

 भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम, डोंगरदऱ्यांनी व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. हा तालुका बांबुकरीता प्रसिध्द आहे. तालुक्यातील लोकांचा व्यवसाय शेती असून शेती सोबतच जंगलातील वनोपजावर देखील त्यांचे जीवन अवलंबून आहे. तालुक्यात एकुण 128 गावे असुन त्यापैकी अतिदुर्गम व अतिमागास बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा या गावातील लोक मागील कित्येक वर्षापासून सामुहिक वन हक्क मिळण्यापासुन वंचित होते.

परंतु जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड तालुक्याचे तहसिलदार अनमोल कांबळे तसेच त्यांच्या अधिनस्त तलाठी वृषभ हीचामी तसेच सर्व कोतवाल यांनी याबाबत तातडीने प्रक्रिया पुर्ण केली. स्थानिक कोतवाल रायधर बाकडा, मारोती दुर्वा, चुक्कु उसेंडी, सत्तु पोदाळी, दिनकर उसेंडी, शंकर मडावी, आकाश काळंगा तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चौव्हाण व त्यांचे अधिनस्त क्षेत्रपाल व वनरक्षक यांचे प्रयत्नामुळेही या गावातील लोकांना सामुहिक वनहक्क मिळविण्याच्या प्रक्रियेत मदत मिळाली आहे. सदर सामुमहिक वनहक्क दावे लवकरात लवकर मंजूर होण्याकरीता जिल्हाधिकारी दिपक सिंगला व उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी जिल्हा स्तरीय वनहक्क समितीमार्फत सदर वनहक्क दावे त्वरीत मंजूर होण्याकरीता विशेष प्रयत्न केले. सदरील शिल्लक सामुहिक वनहक्क दावे मंजूर झाल्यामुळे आता भामरागड तालुका १०० टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका म्हणुन नावारुपास आलेला आहे. शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून सामुहिक वनहक्क मान्य करण्यात आलेल्या गावातील लोकांचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदाल यांचे अध्यक्षतेखाली मौजा बिनागुंडा याठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले. त्या शिबीरात मौजा बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा गावातील लोकांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली. लोकांनी मान्यवारांच्या हस्ते सामुहिक वनहक्क पट्टे स्वीकारुन शासनाचे आभार मानले. सामुहिक वनहक्क न मिळाल्यामुळे आजपर्यंत बांबु कटाई करु शकत नव्हते. पुर्वी गावातील लोकांना बाराही महिने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या, परंतु सामुहिक वनहक्क मिळाल्यामुळे बांबु कटाई शक्य होईल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदल यांनी सामुहिक वनहक्काचे व्यवस्थापन, संरक्षण, पुनर्निर्माण व संवर्धन करण्याकरीता नियोजनबध्द पध्दतीचा अवलंब करावा व ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे याबाबत लोकांना मार्गदर्शन केले आहे. याठिकाणी उपसिथतांनी आपापल्या गावातील रोड, आरोग्य व शिक्षणाशी संबंधीत समस्या मान्यवारांच्या समोर मांडून ते सोडविण्यास देखील विनंती केली. त्यानुसार बिनागुंडा येथील विनोबा शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्राला भेट देवून सदरील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी दिले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.