नागपूर : करंजच्या बियांपासून मिळते बायो डिझेल आणि ढेप- गडकरी

नागपूर, 27 डिसेंबर : करंज या झाडांच्या बियांपासून तंत्रज्ञानाचा वापर करून बायोडिझेल निर्मिती होऊ शकते हे सिध्द झाले आहे. करंजच्या 3 किलो बियांपासून 1 लिटर बायो डिझल आणि 2 किलो ढेप प्राप्त होते. या ढेपीवर अधिक संशोधन करून शेतकर्‍यांसाठी कीटकनाशक कसे तयार करता येईल यावर संशोधन व्हावे, अशी अपेक्षा महामार्ग रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ग्रीक क्रूड अ‍ॅण्ड बायो फ़्यूएल फाऊंडेशनतर्फे करंजच्या झाडाच्या हजारो रोपट्यांचे गडकरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वातावरणाला कार्बन डायऑक्साईड मुक्त करण्यासाठी गडकरी यांच्या मार्गदर्शनात ही संस्था काम करीत आहे. व्यासपीठावर डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. राजेश मुरकुटे, अजित पारसे उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, एकेका क्षेत्रापासून ग्रामीण, कृषी क्षेत्रातील गरिबी कशी दूर करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करताना गडकरी म्हणाले की, करंजपासून निर्माण झालेले हे जैविक इंधन आपल्या परंपरागत डिझेलपेक्षा चांगले आहे. प्रदूषण न करणारे आहे. नागपूर शहर प्रदूषणमुक्त करण्याचा माझा प्रयत्न असून परंपरागत पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा. इथेनॉलचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक व्यक्तीने करंजची 5 झाडे लावावी. 3 वर्षे या झाडांना जगवल्यानंतर 4 थ्या वर्षापासून त्याला फळे येण्यास सुरुवात होते. 30 किलो बियाणे जरी या फळातून दरवर्षी निघाले तर वर्षाला 25 ते 30 रुपये मिळतील. शेतकरी आपल्या शेतीच्या धुर्‍यावर ही झाडे लावू शकतात. गरीब माणूस, शेतकर्‍यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहाचावे. विविध मार्गाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍याला कसे स्वावलंबी बनवता येईल, त्याचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.‘ऑरगॅनिक कार्बन’मुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ होते हे अनेकदा सिध्द झाले असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर आता थांबला पाहिजे. सेंद्रीय खतामुळे वस्तूमध्ये येणारी चव ही रासायनिक उत्पादनापेक्षा चांगली असते. तंत्रज्ञानाचा उपयोग करून करंजच्या बियांचे उत्पादन कसे वाढेल, त्यातून मिळणार्‍या तेलाचे प्रमाण कसे वाढेल यावर प्रयोग करून संशोधन होणे आवश्यक आहे. ही झाडे ई टॅग करा म्हणजे त्याचा हिशेब ठेवणेही शक्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी डॉ. हेमंत जांभेकर यांनी करंज झाडापासून मिळणार्‍या तेलबियांमुळे इंधनाच्या क्षेत्रात क्रांती घडू शकते असे सांगितले. करंजच्या एका झाडापासून 50 किलो फळे मिळतात. फळांपासून 30 किलो बिया आणि बियांपासून 27 टक्के तेल (बायो डिझेल) मिळते. आपल्याकडील गडचिरोलीतून 1200 टन करंजच्या बिया छत्तीसगडमध्ये नेण्यात आल्या. विदर्भात मोठ्या प्रमाणात करंजचे उत्पादन होऊ शकते. करंजची एका हेक्टरमध्ये 600 झाडे लागू शकतात. या झाडांच्या बियांपासून 6 हजार किलो बायो डिझेल मिळेल. यामुळे शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची प्रचंड क्षमता या करंजमध्ये आहे. परिणामी शहर प्रदूषण मुक्त होईल, याकडेही डॉ. जांभेकर यांनी लक्ष वेधले. या क्षेत्रात डॉ. जांभेकर काम करीत आहेत. विविध शास्त्रज्ञ व तज्ञांचे मार्गदर्शनही मिळवीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.