देव हाच मंदिराच्या मालमत्तेचा मालक : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : देव हाच मंदिराशी संबंधित जमिनीचा मालक आहे. मंदिराच्या पुजाऱ्याला आपण भू-स्वामी मानू शकत नाही. त्यामुळे पुजाऱ्याने केवळ मंदिराच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाच्या उद्देशाने काम करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. देवस्थानांची मालमत्ता पुजाऱ्यांकडून अवैधरीत्या विकली जाऊ नये म्हणून मध्यप्रदेश सरकारने मंदिरांच्या जमिनीशी संबंधित महसुली नोंदींमधून पुजाऱ्यांची नावे हटवण्याचे आदेश दिले होते. सरकारचा हा निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला होता. हायकोर्टाच्या
या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी करताना मालकी महसुली नोंदणीच्या दस्तऐवजात मालकी हक्काच्या रकान्यात देवाचेच नाव लिहिले जावे, असे स्पष्ट केले. याप्रकरणी खंडपीठाने राम मंदिर खटल्याचा दाखला देत, देव हा न्यायिक व्यक्ती असल्याने मंदिराच्या जमिनीचा मालक असल्याचे सांगितले. देवस्थानाशी संबंधित मालमत्तेवर देवाचाच अधिकार असतो. केवळ या मालमत्तेचे व्यवस्थापन विश्वस्त, पुजारी, सेवकांद्वारे केले जाते. त्यामुळे पुजाऱ्याचे नाव मालकी हक्काच्या रकान्यात लिहिण्याची गरज नाही, असे खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले. पुजारी हा देवाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारा एक विश्वस्त आहे. तो त्याचे काम करण्यास अपयशी ठरला तर त्याला हटवलेदेखील जाऊ शकते. कायद्यानुसार महसुलापासून सूट मिळालेल्या जमिनीवर पुजाऱ्याचा कोणताही अधिकार नसतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.