बलात्काराच्या आरोपींच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Share This News

गोंदिया,दि.10 –

गोंदियाः झारखंड येथे बलात्काराचा गुन्हा करून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन आरोपींच्या रेल्वे पोलिसांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर मुसक्या आवळल्या.
झारखंडमधील सिरी या गावातील रहिवासी असलेल्या तीन आरोपींवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा केल्यानंतर राजेश मंडल (वय २१), राधेश्याम मंडल (वय २४) व विजय मंडल (वय २०) हे तिन्ही आरोपी हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने टाटानगर येथून सुरतला जाण्यासाठी निघाले होते. याबाबतची माहिती झारखंड पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून या तीन गुन्हेगारांबाबत माहिती दिली. या दरम्यान अनेक रेल्वे स्थानकांवर या आरोपींचा शोध घेण्यात आला. गोंदिया येथील रेल्वे पोलिसांनाही या आरोपींबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसचे सर्व डबे तपासल्यावर हे आरोपी आढळून आले. पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे. त्यांना लवकरच झारखंड पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.