कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे सरकारचे आदेश

कोरोना महामारीच्या काळात अनेक उलट सुलट बातम्या लोकांपर्यत येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक वेगाने माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर करुन कोरोना विषयी अनेक अफवा त्याचप्रमाणे चुकीची माहिती पसरवण्याचे काम केले जाते. यामुळे लोकांच्या मनात भिती निर्माण होते. अशा अफवा पसरवून लोकांच्या मनात भिती निर्माण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक,ट्विटरला कोरोनाशी संबंधित खोटी माहिती पसरवणाऱ्या जवळपास १०० पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. गेली अनेक दिवस कोरोना विषयी अनेक खोटे मेसेज, लसीसंदर्भात अनेक खोट्या व्हिडिओ, पोस्ट्स त्याचप्रमाणे कोरोनावर करता येणार चुकीचे घरगुती उपाय, अनेक राजकीय विश्लेषणांमधून कोरोना विषयी चुकीची माहिती, अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर निर्बंध घालण्यासाठी सोशल मीडियावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर ट्विटरने असे म्हटले आहे की, आमच्याकडे कायदेशीर विनंती आल्यानंतर आम्ही संबंधित पोस्ट ट्विटरच्या कायदे आणि नियमांनुसार त्याचा आढावा घेतो. जर त्या पोस्टमध्ये ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यावर आम्ही योग्य कारवाई करतो. ल्युमेन डेटाबेसनुसार, सरकारच्या आदेशानंतर ट्विटरवरील जवळपास ५० ट्विट्स काढून टाकण्यात आली आहेत. युझर्सना आम्ही कारवाई करण्याआधी सूचना दिल्या होत्या. काढून टाकण्यात आलेल्या ५० ट्विटर पोस्ट्समध्ये खासदार, आमदार आणि चित्रपट निर्मात्यांचाही समावेश होता.

कोरोनाच्या काळात नागरिक आधीच घाबरले आहेत. सर्वत्र नकारात्मकता आहे. त्यात सोशल मीडियामार्फत सार्वजनिक व्यवस्थेत काही गडबड होऊ नये त्याचबरोबर लोकांपर्यंत कोणतीही चुकीची माहिती जाऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर वेब साईट्सना सरकारने कोरोनाच्या विरोधात कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट त्वरित डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.