लॉकडाउनमुळे किती बेरोजगारांना मिळाल्या नोकऱ्या?ठाकरे सरकारने आकडेवारी केली जाहीर

Share This News

मुंबई, 19 जानेवारी : कोरोनामुळे (Corona) राज्यासह देशभरात लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला होता. लॉकडाउनच्या काळात अनेक जणांनी नोकऱ्या गमावल्या होत्या. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2020 या संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीत 1 लाख 99 हजार 486 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आले, अशी माहिती  कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळात डिसेंबरअखेरपर्यंत 1 लाख 63 हजार 071 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

डिसेंबरमध्ये 34 हजार 763 बेरोजगारांना मिळाला रोजगार

डिसेंबरमध्ये विभागाकडे 89 हजार 328 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात 12 हजार 680, नाशिक विभागात 22 हजार 844, पुणे विभागात 20 हजार 945, औरंगाबाद विभागात 16 हजार 530, अमरावती विभागात 8 हजार 666 तर नागपूर विभागात 7 हजार 663 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 34 हजार 763 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 902, नाशिक विभागात 14 हजार 920, पुणे विभागात 6 हजार 826, औरंगाबाद विभागात 8 हजार 145, अमरावती विभागात 3 हजार 928 तर नागपूर विभागात 42 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले, अशी माहिती देण्यात आली.

महारोजगार मेळाव्यास मोठे यश

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये 12 ते 20 डिसेंबर 2020 दरम्यान झालेल्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास मोठे यश मिळाले. यामध्ये राज्याच्या विविध भागातून ४९७ उद्योगांनी त्यांच्याकडील ८६ हजार ४३५ रिक्तपदे या मेळाव्यातून भरण्यासाठी खुली केली. या पदांसाठी १ लाख ६० हजार ८२७ बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ५ हजार २८१ उमेदवारांना आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून उर्वरिक्त रिक्त पदांची भरतीप्रक्रीया सुरू आहे, अशी माहितीही मलिक यांनी दिली.

रोजगाराची ही चळवळ यापुढील काळातही सुरुच राहणार आहे. यासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहनही मलिक यांनी केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.