कोरोना चाचणी केंद्रांवर  तपासणीसाठी नागरिकांची उडाली प्रचंड गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोना चाचणी केंद्रांवर देखील तपासणीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत चाचण्यांची संख्या वाढल्याने प्रयोगशाळांवर देखील कामाचा ताण वाढला असून, परिणामी अहवाल येण्यासाठी तीन ते चार दिवस रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. या कालावधीत कोरोनाची तपासणी केलेला रुग्ण हा अनेक ठिकाणी फिरून प्रादुर्भाव पसरवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता लक्षणे असलेल्यांच्या घशातील तपासणी केंद्रावर आरटीपीसीआरसोबतच रॅपिड अँन्टिजेन तपासणीकरिता दोन स्वॅब घेण्यात येणार असून, या माध्यमातून संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. तपासण्या वाढल्यामुळे प्रयोगशाळांवरील ताण वाढला आहे. आज च्या घडीला शहरात मेयो, मेडिकल, एम्स, नीरी, खासगी लॅब व नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेसोबतच अँन्टिजेन तपासणीद्वारे कोरोना अहवालाची तपासणी करण्यात येत आहे. परंतु शासन निर्देशानुसार रॅपिड अँन्टिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. दररोज शहरात १९ हजारांवर चाचण्या होत आहेत. यातील ७५ टक्क्यांहून अधिक चाचण्या या आरटीपीसीआरच्या होत आहेत. निश्‍चितच आता रुग्णसंख्या वाढत चालली आहे. लक्षणे असलेल्यांचीही संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत तपासणी केल्यानंतर लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेला रुग्ण हा अहवाल येईस्तोर तीन-चार दिवस अनेक ठिकाणी फिरत असतो. यामुळे तो इतरांच्या संपर्कात येऊन त्यांनाही कोरोनाची लागत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उद्या शुक्रवारपासून शहरातील प्रत्येक कोरोना चाचणी केंद्रावर लक्षणे असलेल्या रुग्णांचे दोन स्वॅब घेण्यात येईल. यातील एक स्वॅब आरटीपीसीआर तपासणीसाठी तर दुसरा रॅपिड अँन्टिजेन तपासणीकरिता घेतला जाईल. रॅपिडमध्ये जो रुग्ण बाधित आढळून आला त्याला त्याच्या परिस्थितीनुसार गृह विलगीकरण अथवा रुग्णालय, सीसीसीमध्ये विलग ठेवण्यात येणार आहे

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.