हिंमत असेल तर जावेद अख्तर यांना बेड्या ठोका भाजपा नेते राम कदम यांचे शिवसेनेला खुले आव्हान

मुंबई : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात लेखक जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आज शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मागील काही दिवसांपासून वाद निर्माण झालेला असतानाच आता शिवसेनेने या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असे म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचे असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. यावरुनच आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी थेट जावेद अख्तर यांच्या अटकेची मागणी केली.
‘सामना’च्या अग्रलेखामधून जावेद अख्तर यांची भूमिका योग्य नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. हाच लेख ट्विट करत राम कदम यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. जिलेबीसारखी गोल गोल भाषा? एका ठिकाणी शिवसेना मान्य करते आहे की जावेद अख्तर यांनी चुकीचे विधान केले आहे. मग वाट कसली पाहताय? आम्ही तक्रार करून 24 तास होऊनही त्यांना अटक का करत नाही? हिंम्मत असेल तर ठोका बेड्या? त्याच्या घरासमोर, राडा करण्यापासून कोणी रोखले तुम्हाला?, असे प्रश्‍न राम कदम यांनी उपस्थित केलेत. जावेद अख्तर यांना माफी मागावी लागेल. त्यांनी भारतातला व्यवहार बघितला आहे. एकदा त्यांनी अफगाणिस्तानला जावे, तालिबानी व्यवहार बघावा. आपोआप त्यांना सद्बुद्धी सुचेल की हात जोडून माफी मागितली पाहिजे, असेही राम कदम म्हणालेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.