निष्ठा व समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल – राज्यपाल

मुंबई, २४ जानेवारी, : एक प्रगत देश म्हणून उदयास येण्याच्या निर्णायक वळणावर देश उभा असताना युवा पिढीने निष्ठा व समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला. राज्यातील लोक विविध क्षेत्रात नवोन्मेष व नवसृजनातून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून ते युवा पिढीला निश्चितपणे प्रेरणा देईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
 सेंद्रिय शेती, बांधकाम व्यवसाय, उद्योग, आदरातिथ्य, आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ३४ निवडक व्यक्ती व संस्थांना राज्यपालांच्या उपस्थितीत लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सहारा स्टार हॉटेल येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच लोकमत मिडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा उपस्थित होते. पुरस्कारार्थींचा कार्याचा उल्लेख असलेल्या ‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. 
 देश आज अभूतपूर्व अशा कालखंडातून जात आहे असे नमूद करून अनेक क्षेत्रात देश गरुडझेप घेत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. अश्यावेळी नवउदयमी युवक देशाला खूप पुढे नेऊ शकतात. याकरिता नव उद्योजकांची पिढी तयार झाली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सुवर्ण महोत्सवी वाटचाल करीत असलेले लोकमत वृत्तपत्र खर्‍या अर्थाने जनतेचा आवाज झाले आहे, असे त्यांनी सांगितले. आपण दिल्ली येथे जातो तसेच राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार असल्यामुळे गोवा येथे जातो. या दोन्ही ठिकाणी लोकमत वृत्तपत्र आवर्जून वाचायला मिळते, असे राज्यपालांनी सांगितले. 
 राजकारणाबाहेर उल्लेखनीय कार्य करणार्‍या लोकांचा बहुमान करून लोकमतने चांगला पायंडा घातला आहे. लोकमत वृत्तपत्र सत्याधारीत योग्य बातम्या देत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते सचिन पिळगावकर, नागराज मंजुळे, उषा काकडे, चिराग शाह, अभिषेक विचारे, डॉ. मिलिंद शिरोडकर, डॉ. रविराज अहिरराव, डॉ. अमोल डोंगरीकर, सीताराम राणे, राजयोगी मणिलाल छेडा, डॉ. परमेश्वर गटकळ, एस आर व्ही समूह रुग्णालयांचे डॉ. अभय विसपुते, डॉ. सुहास अवचट आणि दीपा अवचट, मोहम्मद शरीफ टीम, योगेश लखणी, किशोर आहुजा, शशि यादव, राजेंद्र पाटील, शिवाजीराव जोंधले आदींचा यांचा सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.