अवैध मासेमारी करणाऱ्याला अटक

पेंच व्याघ्र प्रकल्पातील घटना

पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील 25 वा व्याघ्र प्रकल्प असून हे राखीव जंगलक्षेत्र हे वाघांचा विशेष अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे. या राखीव जंगल क्षेत्रात मासेमारी करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते. दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी पूर्व पेंच वनपरिक्षेत्र च्या तोतलाडोह जलाशयामध्ये 7 ते 8 बोटीमध्ये काही इसम अवैधरित्या मासेमारी करत असल्याचे विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या गस्ती पथकाला दिसून आले. गस्ती पथकातील जवानांनी अवैध मासेमारी करणाऱ्या टोळक्याचा पाठलाग करून एका मासेमाऱ्यास शिताफीने पकडले. घटनेची माहिती मिळताच पूर्व पेंच वनपरिक्षेत्र चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मंगेश ताटे हे अतिरिक्त मनुष्यबळासह घटनास्थळी दाखल झाले, त्याच बरोबर देवलापार पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पुंजरवाड आपल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. वनपरिक्षेत्रातील कक्ष 530 मधील एका निर्जन बेटावर मासेमार यांनी आग लावल्याचे निदर्शनास आल्याबरोबर त्यांना पकडण्यासाठी वन आणि पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवली. मासेमार यांच्याकडून विरोधात दगडफेक आणि हल्ला झाल्याने वन विभागाला स्वरक्षणासाठी हवेत गोळीबार देखील करावा लागला. रात्रभर चाललेल्या या मोहिमेत मासेमाऱ्यांचा पाठलाग करून दोन बोटीसह जवळपास 150 नग जाळे जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेला इसम नामे अक्रम शेख रा. न्यू तोतलाडोह वडांबा, ता. रामटेक जि. नागपूर येथील रहिवासी आहे, त्याच्यावर रीतसर वनगुन्हा नोंद करण्यात आला असून मा. प्रथम वर्ग न्यायालय, रामटेक यांनी त्यास तीन दिवसासाठी वन कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक अतुल देवकर, वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, वनपाल श्रीराम केकान, वनरक्षक गजानन गरके करत आहेत. या संपूर्ण घटनेत विशेष व्याघ्र संरक्षण दल, तोतलाडोह-खुरसापार तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.