नव्या लसीकरण केंद्राचे उदघाटन Inauguration of new vaccination center

Share This News

नागपूर, 8  मार्च जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपुरातील नव्या लसीकरण केंद्राचे उदघाटन केले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मेहंदीबाग आणि लकडगंज झोन अंतर्गत बाबूलबन लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. तसेच गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील व्यवस्थेचीही पाहणी केली.

नागपुरात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी व्हायला लागली. ऑनलाईन नोंदणीमध्ये अडचणी येत असल्या कारणाने अनेक नागरिकांनी लसीकरण केंद्रांवरच नोंदणीसाठी गर्दी करणे सुरू केले. यामुळे ज्येष्ठांना ताटकळत राहावे लागत होते. यावर तोडगा म्हणून झोन कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला.

शासनाच्या आदेशानुसार आता लसीकरण केंद्रांवर दोन पाळीत लसीकरण सुरू करण्यात आले. सकाळी ८ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळात सुमारे १४ तास लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. येथे लसीकरण व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मानेवाडा केंद्रांवर दररोज १०० पेक्षा अधिक ज्येष्ठांची लसीकरणासाठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठांच्या सुविधेसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता मेहंदीबाग आणि बाबूलबन परिसरात लसीकरण केंद्राला नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता दोन पाळी सुमारे १४ तास लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मनपाचे अधिकारी, कर्मचारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमात आपणही सहभाग घ्यावा. शनिवार, रविवारी घरी बसून आपल्या मोबाईलवर यासंदर्भातील संदेश लोकांना पाठवावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उत्स्फूर्त बंद पाळल्याबद्दल महापौरांनी मानले  नागरिकांचे आभार

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. या आदेशाचे पालन करीत नागपुरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले. याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांचे आभार मानले. बाजार परिसरात फिरून त्यांनी कोरोना नियमासंदर्भात जनजागृतीही केली.

शनिवार आणि रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी दही बाजार, इतवारी, बर्डी परिसरातील बाजारांचा दौरा केला. अनेक भाजी, फळविक्रेते मास्क परिधान केलेले नव्हते. त्यांना महापौरांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन केले. यानंतर पुन्हा मास्कविना आढळले तर दंड ठोठावण्याचे निर्देश सोबत असलेल्या उपद्रव शोध पथकाला त्यांनी दिले. जे मास्कविना आढळतात अशा विक्रेत्यांना प्रथम समज द्या, जनजागृती करा, त्यानंतरही ते ऐकत नसेल तर दंड आकारा, असे निर्देश त्यांनी दिले.

शनिवार आणि रविवारी बाजारात प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचा संभव असतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची नागपुरातील बहुतांश सर्वच व्यापारी, नागरिकांनी अंमलबजावणी केली. त्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व व्यापारी, नागरिकांचे आभार मानले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.