जावेद अख्तर यांच्या मुंबईतील घराबाहेरील सुरक्षेत वाढ

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने केली माफीची मागणी

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केली होती. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली असतांना कालच भाजपाने या ठिकाणी जावेद अख्तर यांनी माफी मागावी यासाठी आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाराष्ट्र भाजपाने अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती आहे. जुहूमधील इस्कॉन मंदिराजवळ असणाऱ्या अख्तर यांच्या घराबाहेर अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उजव्या विचारसरणीच्या जगभरातील संघटनांचे विचार हे सारखेच असतात असे मत अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे अख्तर म्हणाले होते. ‘आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील’, असे अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर भाजपा नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करीत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर म्हणाले. जावेद अख्तर यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.