भारतीय पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमकडून 5-2 ने पराभव

टोकियो, 03 ऑगस्ट : ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा 5-2 च्या अंतराने पराभव झाला. बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची टोकियो ऑलिम्पिकमधील ही ड्रीम रन संपुष्टात आली. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होतं. मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

या सामन्यातील पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवले. सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत 2-0 ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने 2-1 ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना 2-2 च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल झळकावले. बेल्जियमकडून अॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅटट्रीक केली. भारताला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखण्यात यश आले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. नंतर मात्र बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचं सोनं करत भारतावर आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने 5-2 ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाच पैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. बेल्जियम यंदा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळाले होते.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.