ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर आत्ता नाही तर काँग्रेसच्या काळात झाला : देवेंद्र फडणवीस

Share This News

 गोव्याला जाताना काही वेळेसाठी सावंतवाडी भाजप कार्यालयाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ईडी कारवाईवरुन भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं. तसेच ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात झाल्याचा आरोप केला. ज्यांच्याविरुद्ध तक्रारी किंवा पुरावे आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे, असाही दावा फडणवीसांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण हेही उपस्थित होते (Devendra Fadnavis criticize Congress over ED notice and allegations).

ईडीकडून होत असलेल्या कारवाई संदर्भात काँग्रेसने भाजपवर टीका केली होती. ईडीने आपलं कार्यालय भाजपच्या कार्यालयात हलवावं, अशीही टीका काँग्रेसने केली होती. त्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात झाला. या काळात हा गैरवापर होत नाही. त्यांमुळे त्यांचा काळ माहिती आहे आणि त्यावेळी ते कसे गैरवापर करायचे हे त्यांना माहिती आहे. आत्ता ज्यांच्याबद्दल तक्रारी असतील किंवा काही पुरावे असतील तर त्यासंदर्भात चौकशी होते. माझं पहिल्यापासून स्पष्ट मत आहे, की आपण जर काही केलं नसेल, तर कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. कुठलीही संस्था कुणावरही थेट कारवाई करू शकत नाही.”

‘ठाकरे सरकारने केवळ शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाही’

“या सरकारने केवळ शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत केली नाही. अगदी निसर्ग चक्रीवादळानंतरही पहिल्यांदा तुटपुंजी मदत केली. याशिवाय जी मदत घोषित केली तीही कुठे मिळाली नाही. अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेकांशी चर्चा केली, पण कुणीही मदत मिळाल्याचं सांगितलं नाही,” असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारवर घोटाळे केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मी सरकारचे एकएक घोटाळे उघडकीस आणले आहेत. तसेच यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीय. सरकारने कारवाई केली नाही, तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे.”


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.