राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा: आंतरराष्ट्रीय पैलवान नरसिंग यादव महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार

आगामी सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पैलवान नरसिंग यादव महाराष्ट्राकडून खेळणार आहे. ७४ किलो वजनी गटात नरसिंग यादव महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा येत्या २३ आणि २४ जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन नोएडा येथे करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या संघ निवडीसाठी पुण्यातील कात्रजमधील मामासाहेब मोहोळ केंद्रात सीनियर गटाच्या राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यातून दहा जणांची निवड करण्यात आली आहे.

सीनियर गटाच्या राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेतून महाराष्ट्राचा दहा सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पैलवान नरसिंग यादव याचा देखील समावेश आहे. नरसिगं यादवची सीनियर गटाच्या राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत एकही कुस्ती न खेळता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

नरसिंग यादव हा महाराष्ट्र पोलीसमध्ये उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. नरसिंग यादवने आंतरराष्ट्रीय कुस्तीत आपलं नाव कमावलं आहे. २०१५ साली लास वेगास येथए झालेल्या जागतिक विजेतेपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं. त्याआधी २०१४ मध्ये इन्चिऑन एशियाडमध्ये तो कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. तर २०१५ साली कतारमधील दोहा येथे झालेल्या आशियाई कुस्तीत नरसिंग यादवने कांस्यपदकाची कमाई केली होती. २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नरसिंगने सुवर्णपदक पटकावंल होतं. नरसिंगच्या या दमदार कामगिरीमुळेच सीनियर गटाच्या राज्य निवड चाचणीत त्याच्यासमोर एकाही पैलवानानं आव्हान उभं करण्याचं टाळलं. त्यामुळं एकही कुस्ती न खेळता नरसिंग यादव महाराष्ट्राच्या संघात दाखल झाला.

महाराष्ट्राचा संघ : विजय पाटील (५७ किलो), सूरज कोकाटे (६१ किलो), अक्षय हिरुगडे (६५ किलो), कालिचरण सोलनकर (७० किलो), नरसिंग यादव (७४ किलो), समीर शेख (७९ किलो), वेताळ शेळके (८६ किलो), पृथ्वीराज पाटील (९२ किलो), सिकंदर शेख (९७ किलो), शुभम सिदनाळे (९७ किलोवरील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.