समृद्धीच्या बांधकामात अनियमितता; नागरिक त्रस्त

आमदार समीर मेघे उतरले पीडित शेतकर्‍यांसह रस्त्यावर

वानाडोंगरी : समृद्धी महामार्ग निर्मिती कार्याची संथगती, कंत्राटदाराच्या बेफीकरीपणामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे होत असलेले अतोनात नुकसान, खेडेगावासाठी असलेल्या पोचमार्गाची दुरवस्था आणि शासनाचे नियम ढाब्यावर बसवून नियमबाह्य केलेल्या उत्खन्नामुळे मूळ मालक शेतकर्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत या शेतकर्‍यांना मोठय़ा स्वरुपाची दंडात्मक रक्कम भरण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे. या सर्व बाबीच्या विरोधात समृद्धी महामार्गाच्या आसपासच्या परिसरातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरुक नागरिकांनी समृद्धी महामार्ग कॅम्प, कान्होलीबारा येथे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात सोमवारी (२८ डिसेंबर) तीव्र निदर्शनाद्वारे आपला रोष व्यक्त केला.

राज्यातील महत्वाकांशी समृद्धी महामार्ग निर्मिती प्रकल्पाचे कार्यान्वयनास सुमारे वर्षभरापूर्वीच सुरुवात झालेली आहे. सदर प्रकल्पाच्या तुलनात्मक प्रगतीचा आलेख पाहता इतर भागातील झालेल्या कामाचे प्रमाणात नागपूर विभागातील काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे सद्यस्थितीत केवळ २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम झालेले आहे. कामाचे कार्यान्वयनात कुठेही समन्वय दिसून येत नाही. काम करीत असलेल्या कंत्राटदारांनी महामार्ग निर्मितीकरीता आवश्यक मुरूम, माती व खडीचे भरण करण्यासाठी जवळच्या शेतकर्‍यांकडून त्यांच्या जमिनी लीजवर घेतलेल्या आहेत. संबंधित तहसील कार्यालयाकडून नियमानुसार उत्खनन करण्यास मंजुरी दिल्याप्रमाणे उत्खनन करणे आवश्यक होते. परंतु, उत्खनन जास्त करण्यात आल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांवर झालेल्या कार्यवाहीत मोठय़ाप्रमाणात दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

शेतकरी दंडाची रक्कम भरूच शकत नाही. तसेच समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी होत असलेल्या जडवाहनांच्या वाहतुकीने परिसरातील अनेक लहान रस्ते/ मार्ग नादुरूस्त झालेले असल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचे होत आहे. याशिवाय सततच्या वाहतुकीने परिसरातील शेतामधील पिकावर धूळ उडून मोठय़ा स्वरूपाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केलेल्या आहेत. याबाबत कंत्राटदार व संबंधित स्थानिक स्तरावरील अधिकार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या असतानासुद्धा त्याची दखल घेण्यात आली नसल्याने नियोजित समृद्धी महामार्ग परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. याप्रसंगी आमदार समीर मेघे यांनी प्रकल्प व्यवस्थापक बिजलीकुमार यांच्याशी चर्चा करून पीडित शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्या तसेच शेतकर्‍यांवर करण्यात येत असलेल्या दंडात्मक कार्यवाही त्वरित थांबविण्यात याव्या, अशी सूचना केली. यावेळी बिजलीकुमार यांनी कंत्राटदारांशी चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यांच्या आश्‍वासनावर शेतकरी असंतुष्ट दिसले.
याप्रसंगी जि. प. सदस्य आतिश उमरे, अर्चना गिरी, पं. स. सदस्य संजय ढोढरे, माजी जि. प. सदस्य अंबादास उके, धनराज आष्टनकर, माजी उपसभापती पं. स. हरिशचंद्र अवचट, कान्होलीबाराचे सरपंच जितू बोटरे, घोडेघाटचे सरपंच शुभम उडाण, हळदगावचे सरपंच दिगांबर धामणे, सावळी बिबीचे उपसरपंच अरुण कोहळे आदिंची उपस्थिती होती.पीडित शेतकर्‍यांसह आंदोलन करताना आमदार समीर मेघे व अन्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.