मेहुणीवरून कुटुंबात कलह, पाच जणांची हत्या, मेहुण्याची आत्महत्या

नागपूरः कुटुंबातील पत्नी, मुले, सासू आणि मेहुणीसह पाच जणांची हत्या करून मेहुण्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कुटुंबातील पाच जणांना ठार करून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव अलोक मातुरकर (वय ३६) असे होते व मेहुणीवर त्याचा डोळा होता. त्यातून दोन कुटुंबांमध्ये कलह निर्माण होऊन हा धक्कादायक प्रकार घडल्याचा तहसील पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तहसील पोलिस हद्दीत पाचपावली रेल्वे फाटकाजवळील चिमाबाई पेठ वस्तीत सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील आरोपी अलोक मातुरकर हा मुळचा अमरावती येथील असून आठ महिन्यांपूर्वीच हे कुटुंब नागपुरात येथे रहायला आले होते. त्याचे सासरही अगदी घरासमोर रस्त्याच्या पलिकडेच आहे. तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री केव्हातरी अलोकचा वाद होऊन त्यात त्याने सासू लक्ष्मी देवीदास बोबडे व मेहुणी अमिषा या दोघींचे गळे चिरून त्यांना ठार मारले. त्यानंतर घरी येऊन त्याने पत्नी विजया मुलगी परी, मुलगा साहील या तिघांनाही त्याच पद्धतीने ठार मारले. मुलांवर त्याने हातोड्याने देखील वार केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शेजाऱ्यांमुळे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अंगावर शहारे आणणारा हा प्रकार उघडकीस आला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोकची मेहुणी अमिषा हिच्यावर वाईट नजर होती. तो सतत तिच्या मागे लागायचा. त्यावरून दोन कुटुंबांमध्ये कलह निर्माण झाला होता. दिड महिन्यापूर्वी अलोक याने अमिषाला मारहाण देखील केली होती. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले व पोलिसांनी अमिषाच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली व समज देऊन अलोकला सोडून दिले. यावरून अलोक व त्याची पत्नी विजया यांच्यातही वाद सुरु होते. रविवारी रात्री या कुटुंबात मोठा वाद झाल्यावर हे प्रकरण घडल्याचे सांगितले जाते. अलोकचा टेलरिंगचा व्यवसाय होता व त्याने घरीच दुकान थाटले होते.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.