कंगना राणावतचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

मुंबई, १९ ऑगस्ट, (हिं.स.) : बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावत हिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. कंगनाने स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तालिबान्यांवर आधारित एक पोस्ट शेअर केली होती आणि यानंतरच कंगनाचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे समजते.

चीनमधून कोणीतरी माझं अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अलर्ट काल रात्री मला इन्स्टाग्रामवर मिळाला होता. माझे नोटिफिकेशन देखील गायब झाले होते. तालिबानवर लिहिलेल्या माझ्या सर्व पोस्ट देखील गायब झाल्या आहेत. माझे इन्स्टाग्राम अकाउंट बंद झाल्याचे कळताच मी याबाबतची माहिती इन्स्टाग्राम कार्यालयात दिली. यानंतर मला एक्सेस मिळाला देखील होता. पण मी जेव्हा काही लिहायला घेतले तेव्हा अकाउंटमधून मी आपोआप लॉगआउट झाल्याचे यावेळी कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमधून सांगितले. बहिणीच्या मोबाईलमध्येही माझं इन्स्टाग्राम अकाउंट सुरू असल्याने तिच्याच मोबाईलमधून नवीन स्टोरी लिहिली, असेही कंगनाने यावेळी सांगितले. इन्स्टाग्राम अकाउंट चीनमधून हॅक झाल्याचा दावा कंगनाने केला असून हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचे तिने यावेळी म्हटले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.