केरळमध्ये निपाह विषाणूने घेतला एकाचा बळी

कोझिकोड, ५ सप्टेंबर : कोरोनानंतर आता निपाह विषाणूचा धोका समोर आला आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये एका १२ वर्षीय मुलाला निपाह विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान शनिवारी रात्री तातडीने राज्यात आरोग्य विभागाची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

केंद्र सरकारकडून देखील याची पुष्टी करण्यात आली असून केंद्राचेही आरोग्य पथक केरळला पाठवण्यात आले आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आम्ही सध्या काही टीम्स तयार केल्या असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर आवश्यक उपाययोजना आधीच सुरू करण्यात आल्या आहेत. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. सरकार पूर्णपणे सतर्क आहे.

दरम्यान, ज्या १२ वर्षीय मुलाला निपाह विषाणूची लागण झाली. त्याच्या संपर्कात असलेले कुटुंबीय आणि इतर व्यक्तींमध्ये निपाहची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.

याआधी केरळच्या कोझिकोडमध्येच १९ मे २०१८ रोजी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ जून २०१८ पर्यंत राज्यात निपाहच्या संक्रमणामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १८ जणांना लागण झाली होती.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.