ईडीच्या कारवाईवरून केशव उपाध्येंचा शरद पवारांवर निशाणा

स्वत: सत्तेत असल्याने सगळे बिनदिक्कत, कोणत्याही भीतीशिवाय सुरू होते’

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये ईडीकडून कारवाई केली जात आहे. सत्तेसाठी आणि बदल्याच्या भावनेतून ही, कारवाई होत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात यावरून खडाजंगी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांनी एकाचवेळी ‘ईडी’च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? असा सवाल करीत ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असे म्हटले होते. यावर उत्तर देत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
‘पुर्वी तुम्हीच सत्तेत होता त्यामुळे तुम्ही काहीही केले, कोणतीही भानगड केली, तरी तुमच्यावर ईडी कारवाई कशाला करेल? असा सवाल करीत स्वत: सत्तेत असल्याने सगळे बिनदिक्कत, कोणत्याही भीतीशिवाय सुरू होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होत आहे. यापुढे अशा भानगडी चालणार नाहीत, असा निशाणा उपाध्ये यांनी पवारांवर साधला आहे. विशेष म्हणजे ईडीच्या कारवाईवरून पवारांनी केंद्रावर निशाणा साधताना म्हटले होते की, ‘महाराष्ट्रात इतक्या वर्षांत इतक्या ईडीच्या केसेस कधी ऐकल्या आहेत का तुम्ही? खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक जणांच्या विरोधात केसेस आहेत. हल्ली विरोधकांना त्रास देण्यासाठी याचा साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. काही काळ येतो, नंतर जातो. जेव्हा हा काळ जाईल, तेव्हा यात दुरुस्त्या होतील’. यावरून उपाध्ये यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.