ही कसली शिवसेना, ही तर औरंगजेब सेना

मुंबई 05 जानेवारी, : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यात शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नसून ती आता औरंगजेबसेना झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 श्री. उपाध्ये म्हणाले की, सत्तेत असूनही शिवसेना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. ज्याप्रमाणे औरंगजेबांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला बोलावून विश्वासघाताने त्यांना अटक केली . औरंगजेबाप्रमाणे सध्याच्या शिवसेनेचे वर्तन आहे. शिवसेनेची बोलण्याची भाषा वेगळी आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा वेगळी भाषा वापरण्याचे कसब आता शिवसेनेने अवगत करून घेतले आहे. म्हणूनच आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती औरंगजेबसेना झाली आहे, असे म्हणावे लागत आहे. 
 श्री. उपाध्ये म्हणाले की, 1995 साली महापालिकेने भाजपा-सेनेने औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळच्या युती सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारने दोनदा न्यायालयात नामांतर प्रस्ताव रद्द करत असल्याचे स्पष्ट केले होते. आज त्याच दोन पक्षासोबत शिवसेना सत्ता चालवत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा भाजपा नगरसेवकांनी अनेकदा नामांतराचा प्रस्ताव दिला होता, स्मरण पत्रेही देऊनही शिवसेनेच्या महापौरांनी त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले होते. औरंगाबादचे नामांतर करण्याची इच्छाशक्ती कधीच शिवसेनेकडे नव्हती म्हणूनच प्रस्ताव दाखल करून घेतला नाही की बोर्डावर आणला नाही . यावेळी श्री. उपाध्ये यांनी औरंगाबाद महापालिका सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तही सादर केले. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अनेकदा या बाबत प्रयत्न केले मात्र शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेकडून कधीच सहकार्य मिळाले नाही. मतांचे राजकारण करत शिवसेनेने औरंगजेबाची वृत्ती दाखविली आहे. शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराबाबत आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.