अडीच कोटींची खंडणी

वृद्ध प्रॉपर्टी डिलरचे अपहरण : कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न

नागपूर
कन्स्ट्रक्शन व प्रॉपर्टी डेव्हलपर्सचे अपहरण करून अडीच कोटींची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. २ लाख रुपयांच्या बदल्यात त्यांची लाखोंची शेतजमीन, करोडोंचे घर हडपण्यासाठी त्यांचे अपहरण केले आणि बंद खोलीत शिवीगाळ व मारहाण केली. मोहन एकनाथ दाणी असे प्रॉपर्टी डिलरचे नाव असून, याप्रकरणी ५ पैकी ३ आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, धंतोली हद्दीत अभ्यंकर रोड, विवेकानंदनगर येथे राहणारे मोहन एकनाथ दाणी (६१) यांचा कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टी डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे. दाणी यांनी डिसेंबर २0२0 मध्ये आरोपी महेश अरविंद साबळे ( ५0) रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, सिव्हिल लाईन आणि मदन चंद्रकांत काळे ( ६२) रा. टिळकनगर यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. परत देताना साबळे आणि काळे यांनी त्यांना १0 टक्के व्याजाने पैसे परत करावे लागतील, असे सांगितले. दरम्यान, दाणी यांना अमेरिकेत असलेल्या त्यांच्या मुलीकडे जायचे असल्याने त्यांनी आरोपी साबळे आणि काळे यांच्याकडून जाण्याचे १ लाख ३ हजार रुपयांचे तिकीट बुक करून घेतले. त्यापूर्वी दाणी यांनी २ लाख रुपयांचा डीडी अल्ट्राटेक कंपनीला दिला असून, तो स्वत:च्या खात्यात जमा होणार असल्याचे आरोपी साबळे आणि काळे यांना सांगून निघून गेले. काही दिवसानंतर ते अमेरिकेतून परत आल्यानंतर आरोपी साबळे आणि काळे त्यांना भेटले आणि घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यास उशीर झाल्याचे सांगून आता ८ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. दरम्यान, आरोपी राकेश वासुदेव डेकाटे (४0) रा. स्नेहनगर, मुकेश वासुदेव डेकाटे, नरेश वासुदेव ठाकरे रा. स्नेहनगर आणि आरोपी महेश साबळे व मदन काळे यांनी मिळून दाणी यांच्या नावाने घेतलेली रक्कम आरोपी राकेश डेकाडेकडून परस्पर घेतली.
दाणी यांच्या नावाने आरोपी डेकाटे यालाच व्याजाचे पैसे देऊन दाणी यांच्या नावाने मुद्दल वाढवत अवैध सावकारी करून त्यांचे हिंगणा येथील ७.८ हेक्टर शेत आरोपी वासुदेव डेकाटे याने आरोपी मुकेश डेकाटे याच्या नावे करून घेतले. दाणी यांच्या पुणे येथील निवासस्थानी वारंवार जाऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. दरम्यानच्या काळात आरोपी राकेश डेकाटे याने दाणी यांच्या वर्धा येथील शेतीच्या कागदपत्रांची मागणी केली. तसेच आरोपी डेकाटे आणि नरेश ठाकरे यांनी अभ्यंकर रोड येथून अपहरण करून आरोपी मुकेश डेकाटे याच्या घाट रोड, गणेशपेठ येथील ऑफीसमध्ये कोंडून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन ५0 कोर्‍या स्टॅम्पपेपरवर सह्य़ा घेतल्या. तसेच २ कोटी ५0 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यांचे विवेकानंदनगर येथील घराचा बळजबरीने ताबा पावती घेऊन मूळ खरेदीचे कागदपत्रे घेऊन घर नावाने करण्याचा दबाव टाकला. दाणी दाम्पत्य हे घरी असताना सर्व आरोपींनी अनेकवेळा त्यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. याप्रकरणी मोहन दाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून राकेश डेकाटे, महेश काळे, मदन साबळे या तिघा जणांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.