लतादीदी, सचिन ही दैवतं, त्यांची नव्हे भाजप आयटी सेलची चौकशी करणार, गृहमंत्र्यांचा धमाका

Share This News

नागपूर: लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. (Anil Deshmukh on celebrity tweet)

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत काही परदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्याला विरोध केला होता. हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे या सेलिब्रिटींनी परदेशी कलाकारांना सुनावले होते. मात्र, सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांना 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु असताना याविषयी बोलावेसे वाटले नाही का, असा आक्षेप घेत नेटकऱ्यांनी भारतीय सेलिब्रिटींवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी होणार, असे संकेत दिले होते. त्यामुळे राज्य सरकार लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याविरुद्ध कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सोमवारी आपली बाजू स्पष्ट केली. सेलिब्रिटींच्या ट्विटबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी म्हणालो, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, पण माझ्या तोंडी लता मंगेशकर, तेंडुलकर यांची चौकशी करणार अशी वाक्यं घालण्यात आली, असे देशमुख यांनी म्हटले.

माझा आदेश हा भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यासाठी होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? दिल्लीमध्ये आम्ही जी चौकशी केली, त्यामध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख आणि 12 इन्फ्ल्युएन्सरची नावं समोर आली आहेत. त्यांची रितसस चौकशी सुरु असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार: अनिल देशमुख

पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.