“खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात”


वकील असीम सरोदे यांचा दावा

पुणे : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) देखील या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता पुण्याचे प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी आपले मत मांडले आहे. “खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात. हे मनी लॉन्ड्रींगचे प्रकरण आहे. याकरिता खडसेंनी आपल्या पदाचा देखील गैरवापर केला असून प्रथमदर्शनी एकनाथ खडसे या प्रकरणात दोषी आढळतात”, असे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. सरोदे यांनी व्हिडिओमार्फत खडसे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर भाष्य करत हे दावे केले आहेत.
सरोदे म्हणाले की, “एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात. कोणत्याही वकिलाने, कायदे तज्ञाने खडसेंच्या भोसरी जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे पाहिली तर त्यांना पैसे कुठून आले? म्हणजेच त्यांचे जावई चौधरी आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात जमा झालेले पैसे नेमके कुठून आले याचा प्रवास जर आपण पहिला तर स्पष्टपणे दिसते की हे मनी लॉन्ड्रींगचे प्रकरण आहे. म्हणून, अन्य न्यायालयीन यंत्रणा आणि ED कडून खडसेंच्या चौकशी, तपास सुरु करण्यात आला आहे.
हे मनी लॉन्ड्रींगच, खडसेंनी पदाचा दुरुपयोग केला आहे!
“कोणत्याही यंत्रणेचा राजकीय हेतूसाठी वापर व्हायला नको. त्याचबरोबर, सूडाच्या हेतूने कोणावर तरी कायदेशीर प्रक्रिया करायची असे देखील व्हायला नको, असे मला वाटते. परंतु, एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मला हे नक्की दिसते की, इथे मनी लॉन्ड्रींग झालेले आहे. पैशांची अफरातफर वा पैसे अनेक ठिकाणांहून आणून एका जागी जमा करणे, त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांनी आपण मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करणे, आपल्या सोयीसाठी काही शासकीय निर्णय फिरवणे या सगळ्या घडामोडी केलेल्या आहेत हे या प्रकरणात दिसते,” असे असीम सरोदे स्पष्ट नमूद करतात.
“संपूर्ण प्रकरण पाहता एकनाथ खडसे हे प्रथमदर्शनी तरी दोषी आहेत, असे आपण म्हणू शकतो. मात्र, कायद्याच्या योग्य प्रक्रियेतून याबाबतचा निर्णय झाला पाहिजे”, असंही यावेळी असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून निश्चितच एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यापुढे हे प्रकरण कोणते नवे वळण घेणार? त्याचप्रमाणे यात खडसेंच्या पक्षाची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका राहणार यासह अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.